पाटोदा । दिनांक ०८। राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी दिली आहे. येत्या १२ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने ‘आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. मागील दहा वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला ‘भगवान भक्तीगड’ असे नांव दिलेले आहे.
तयारीला वेग ; पंकजाताईंचे होणार जोरदार स्वागत —– भगवान भक्तीगडावरील १८ एकर परिसरात हा मेळावा होणार असून डागडूजी, परिसराची स्वच्छता आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताची देखील ग्रामस्थांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्यातून तसेच बाहेरूनही लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.
पंकजाताईंचे मार्गदर्शन ———– हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात. संत भगवान बाबा आणि लोकनेते मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजाताई मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पंकजाताई मुंडे यांचे येत्या १२ तारखेला हेलिकॉप्टरने सावरगांवला आगमन होणार आहे. संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन सकाळी ११ वा. त्या मेळाव्यास संबोधित करतील.
पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा —–—— राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता पंकजाताई मुंडे काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. त्यांचे लाखो समर्थक त्यांना ऐकण्यासाठी भगवान भक्ती गडावर प्रचंड मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून एकूणच सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे