राज्यपालांनी समस्या ऐकल्या, त्या सोडवण्याचे आश्वासन दिले
बीडच्या
इतिहासात प्रथमच राज्यपालांसोबत मान्यवरांची चर्चा
बीड (रिपोर्टर): 2024 च्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता असतानाच आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी बीड दौर्यावर येत अधिकारी, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकार, कलाकार, राजकारणी यासह शहरातल्या अन्य प्रतिष्ठितांसोबत बैठक घेतली. या बैठकीत शहरवासियांनी अनेक प्रश्न आणि मुद्दे राज्यपालांसमोर मांडले. संपादकांनी छोट्या वृत्तपत्रांच्या अनेक समस्या विस्तृतपणे मांडल्या. राज्यपालांनी त्या ऐकून घेऊन सदरील समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पुढे राज्यपालांनी सर्वांच्या समस्या ऐकून घेत त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. बीडच्या इतिहासात प्रथमच एखादा राज्यपाल सर्वक्षेत्रातल्या मान्यवरांसोबत चर्चा करतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो आणि त्या सोडवण्याबाबत आश्वासन देतो, राज्यपालांच्या या भेटीला आणि चर्चासत्राला राजकीय किनार जोडली जात आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण हे आज सकाळी साडे अकरा वा.च्या सुमारास बीडच्या शासकीय विश्रामगृहात डेरेदाखल झाले. राज्यपालांच्या आगमनानिमित्त महालक्ष्मी चौक, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीडकरांच्या वतीने राज्यपाल राधाकृष्णन यांचा हृदयसत्कार झाल्यानंतर सर्वप्रथम राज्यपालांनी सर्व विभागांच्या विभाग प्रमुख, अधिकार्यांची बैठक घेतली. बैठकीत जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला. त्यानंतर साहित्यिक आणि कलाकरांसोबत बैठक घेत चर्चा केली. या वेळी बीड शहरातील कलाकरांसह साहित्यिकांनी वेगवेगळ्या समस्या मांडल्या. पुढे पत्रकार आणि उद्योगपती, व्यावसायिक यांना एकत्रित बोलवून त्यांच्या सोबत चर्चा केली. या वेळी कापसापासून एमआयडीसीच्या जागेपर्यंत ते जीएसटीपर्यंत प्रश्न मांडले गेले. एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यपालांनी त्यासाठीच आम्ही ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा कार्यक्रम राबवत असल्याचे म्हटले. पुढे अन्य प्रतिष्ठीत लोकांसोबत आणि राजकारण्यांसोबत त्यांच्या बैठका झाल्या. मात्र वेळेअभावी राज्यपालांना चर्चासत्र आवरतं घ्यावं लागलं. बैठका आणि चर्चा सत्रामधून राज्यपाल राधाकृष्णन यांनी उपस्थित उद्योगपती, पत्रकार, साहीत्यिक, कलाकार आणि अन्य क्षेत्रातल्या मान्यवरांचे प्रश्न, समस्या ऐकून घेतल्या. त्याचबरोबर त्या सोडवण्याचे आश्वासन तर दिलेच काही समस्या सोडवण्याबाबत संबंधितांना सूचनाही करण्यात आल्या.
अॅड. हेमा पिंपळे यांची निदर्शने
पोलिसांनी घेतले ताब्यात
त्या आरोपींचे एन्काऊंटर करा
माजलगाव यासह इतर ठिकाणी ज्या बलात्काराच्या घटना घडल्या, त्या बलात्कार्यांचे एन्काऊंटर करावे, अशी मागणी करत अॅड. हेमा पिंपळे यांनी शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शने केली. या वेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.