अजित पवारांकडून मुस्लिम समाजाला तर शिंदेकडून बंजारा समाजाला विधान परिषदेत स्थान
मुंबई, (रिपोर्टर)ः- राज्यातील विधानसभा निवडणूकीचे बिगुल कुठल्याही क्षणी वाजणार असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत आहे.विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागायला काही तास उरलेले असतांनाच महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढत भाजपा, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सात सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती निलमा गोरेंच्या उपस्थितीत पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील, महंत बाबुसिंग महाराज तर अजित पवार गटाचे पंकज भुजबळ, इद्रीस नायकवडी तर भाजपाचे विक्रांत पाटील, डॉ.मनिषा कायंदे, चित्रा वाघ यांनी आमदार म्हणून आज शपथ घेतली. यामध्ये अजित पवारांनी इद्रीय नायकवडी यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व करण्यासाठी एक चेहरा दिला तर दुसरीकडे पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती महंत बाबुसिंग महाराज यांना थेट विधान परिषदेत घेवून शिंदे सेना यांनी बंजारा समाजाला न्याय दिला.
2024 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी निवडणुक आयोग दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्या पत्रकार परिषदेच्या अवघ्या तीन तासापुर्वी राज्यातील महायुती सरकारने षटकार नव्हे तर सात आमदार राज्यपाल नियुक्त करून टाकले. यामध्ये भाजपाचे – 3, अजित पवार गटाचे – 2 तर शिंदे सेनेचे -2 आमदार आहेत. निवडणुकीच्या पुर्वीच राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती केली गेली. या नियुक्तीला आव्हान देण्यासाठी ठाकरेंची सेना सर्वोच्च न्यायालयात गेल्याचेही सांगितले जाते. मात्र दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भाजपाचे विक्रांत पाटील, डॉ. मनिषा कायंदे, चित्रा वाघ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पंकज भुजबळ, इद्रीस नायकवडी आणि शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील, महंत बाबुसिंग महाराज यांना विधान परिषद उपसभापती डॉ. निलमा गोरे यांच्या उपस्थितीत आमदारकीची शपथ देण्यात आली. महंत बाबुसिंह महाराज हे पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती आहेत. 2024 ची निवडणूक ही बहुचर्चित आणि जातीय मताच्या समीकरणामध्ये फिरणार असल्याने या सात राज्यपाल नियुक्त आमदारांना अनन्य साधारण महत्व आहे. राष्ट्रवादीकाँग्रेसचे सर्वासर्वे अजित पवार यांनी आपल्यापक्षाकडून जे दोन आमदार विधान परिषदेवर घेतले आहेत. त्यामध्ये इद्रिस नायकवाडी याच्यामधून मुस्लिम समाजाला न्याय दिला आहे.
आठ दिवसापुर्वी इद्रीस नायकवडी यांची रिपोर्टरला भेट
शपथ घेताच शेख तय्यब यांची भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा..
सांगली येथील माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे स्थान असलेले इद्रीस नायकवडी यांनी गेल्या आठ दिवसापुर्वी सायं.दै. बीड रिपोर्टर कार्यालयाला सदिच्छ भेट दिली होती. यावेळी रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी त्यांचा हदय सत्कार केला होता. या भेटीत संपादक शेख तय्यब आणि इद्रीस नायकवडी यांच्यात राजकीय, सामाजिक विषयासह समाजाच्या विविध प्रश्नावर प्रदिर्घ चर्चा झाली होती. बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाच्या प्रश्नावरही शेख तय्यब यांनी चर्चा करत समाजाचे काही प्रश्न इद्रिस नायकवडी यांच्यासमोर मांडले होते. आज इद्रीस नायकवडी यांनी विधान परिषदेवर आमदारकीची शपथ घेतली. भ्रमणध्वनीवरून शेख तय्यब यांनी इद्रीस नायकवडी यांचे अभिनंदन केले.