आमदार समर्थकांचे मात्र प्रवेशाचे मॅसेज
मुंबई/गेवराई (रिपोर्टर): गेवराईचे भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजवण्याचे ठरवले. तशी बोलणी मुंबईत सुरु असून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत लक्ष्मण पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे बदामराव पंडित हे उमेदवारीवर ठाम असल्याने आघाडीमध्ये चर्चा होऊन लक्ष्मण पवारांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होण्याची दाट शक्यता आहे. लक्ष्मण पवारांच्या समर्थकांकडून प्रवेशाबाबतचे मॅसेज जाहीरपणे सोशल मिडियावर फिरत आहेत. त्यांचे निकटवर्तीही प्रवेशाच्या बातमीला दुजोरा देत आहेत, परंतु गेवराईची उमेदवारी पंडित की पवार? यावर प्रवेशाचे अंतिम धोरण आणि तोरण असणार असल्याचे दिसून येते.
निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन समर्थकांना धक्का देणारे आ. लक्ष्मण पवार अखेर समर्थकांच्या इच्छेखातर राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे मध्यंतरी त्यांनी रिपोर्टरच्या ‘थेट सवाल’मध्ये स्पष्ट केले होते. भाजप सोडणार का? यावर त्यांनी ‘ताकाला जायचं आणि भांडं कशाला लपवायचं’ असं म्हटलं होतं. मात्र आता पवारांनी अंतिम निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असून आज संध्याकाळीच आ. लक्ष्मण पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांचे समर्थक तसे मॅसेज बाहेर सोशल मिडियावर देत आहे तर निकटवर्तीयही प्रवेशाबत दुजोरा देत आहेत. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब गटाचे बदामराव पंडित हे गेवराईच्या जागेवर ठाम आहेत, त्यामुळे आघाडीमध्ये गेवराईच्या जागेबाबत ओढाताण सुरू आहे. लक्ष्मण पवार हे मुंबईत डेरेदाखल असून त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकांवर बैठका हाते आहेत. आता आघाडीमध्ये शिवसेना नेते आणि राष्ट्रवादी नेते या जागेवर काय निर्णय घेतात आणि ही जागा नेमकी कोणाला सुटते आणि त्यानंतर आ. पवार हे प्रवेशाबाबत निर्णय घेतील असे एकीकडे सांगितले जात असले तरी दुसरीकडे मात्र आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत लक्ष्मण पवारांचा प्रवेश निश्चित असल्याचे निकटवर्तीयांचे सांगणे आहे.
पवारांना भाजपाने निवडणुकीचे साहित्य पाठविले
टेम्पो तीन तास उभा केला, नंतर सामान कुठंतरी उतरवलं
काल-परवाची ही घटना. भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे भाजप सोडणार हे स्पष्ट झालेले असताना भाजपाच्या यंत्रणेने मात्र दोन दिवसांपूर्वी निवडणुकांचे साहित्य असलेला टेम्पो गेवराईत पाठविला होता. तब्बल दोन ते तीन तास हा टेम्पो सामान उतरवून घेण्याबाबत एका ठिकाणी उभा होता. भाजपाने पाठवलेले सामान उतरवून घेण्यासही विद्यमान आमदार हे अनुत्सुक होते, मात्र नंतर ते सामान कुठेतरी उतरवून घेतल्याचे सांगण्यात येते.