आष्टी (रिपोर्टर): माजी आ. सुरेश धस हे निवडणुकीतून माघार घेण्याबाबतचा संदेश सोशल मिडियावरून व्हायरल झाल्यानंतर आज त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आष्टीतल्या निवासस्थानी एकच गर्दी करत प्रचंड घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच, ही भूमिका कार्यकर्त्यांनी ठासून धसांना सांगितली. काहीही करा, अपक्ष रहा, परंतु निवडणूक लढवा, कार्यकर्त्यांच्या या भूमिकेनंतर आ. सुरेश धसांनी थेट महायुतीतल्या नेत्यांना विनंती केली. तिकिट कोणालाच देऊ नका, आम्ही तिघे उमेदवार इच्छूक आहोत, तेव्हा तिघांना अपक्ष उभे करा जे होईल ते पाहू. माझी शिफारस ज्यांनी केली, त्यांना मी अशीच विनंती करणार आहे. कोणालाच राग नको. आम्ही तिघे महायुतीत आहोत तेव्हा इथला पेच संपुष्टात आणण्यासाठी असा निर्णय घ्या, असे आपण पक्षश्रेष्ठीला सांगणार असल्याचे सुरेश धस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.
महाविकास आघाडीकडून आष्टीचा उमेदवार ठरल्यानंतरही अद्यापपर्यंत महायुतीचा उमेदवार ठरला नाही. उलट येथील तिकीट भाजपाला द्यायचे की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला? इते विद्यमान आमदाराला संधी द्यायची की, कुणाला? यावर खलबते सुरू असताना काल सोशल मिडियावर माजी आ. सुरेश धसांबाबत एक मॅसेज चांगलाच व्हायरल झाला. तो मॅसेज होता, ‘धसांची निवडणुकीतून माघार’ या संदेशानंतर आज सुरेश धस समर्थकांनी थेट धसांचे आष्टीतील घर गाठले. हजारो समर्थक कार्यकर्ते त्यांच्या घराजवळ जमा झाले आणि सुरेश धस यांच्याबाबत घोषणाबाजी करू लागले. ‘धस अण्णा, तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ‘आष्टी का आमदार कैसा हो, सुरेश धस जैसा हो’ असे म्हणत आता माघार नाही, आता निर्धार म्हणत कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. या वेळी आ. सुरेश धसांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यावेळेस धस म्हणाले, मी महायुतीतील सर्व नेत्यांना आणि पक्षश्रेष्ठीला विनंती करतो, होऊन जाऊ द्या, तिघांनीही ही निवडणूक लढवण्याची परवानगी द्या, आम्ही तिघे उमेदवार इच्छूक आहोत ना मग तिघांनाही अपक्ष उभे करा, ज्याची ताकद असेल तो निवडून येईल. महायुतीमधील हा पेच संपवायला हाच पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले. अशा प्रकारचे निवेदन आपण महायुतीच्या नेत्यांना करणार आहोत. आता इथे जो तो उठतो, मला आमदार व्हायचं म्हणतो. ज्याचे त्याच्या गावच्या ग्रामपंचायतीत तीस मते नसतात तोही आमदार व्हायचं म्हणतो. महायुतीमध्ये आष्टीतल्या उमेदवारीचा पेच आहे. तिकडे परळी तुम्हाला दिली, गेवराई तुम्हाला दिली, माजलगाव तुमच्याकडेच आहे, बीडबाबत सेना की राष्ट्रवादी? हा वरचा विषय. आता आष्टीचा विषय आहे, सरळसरळ तिघांनाही संधी द्या, बीड जिल्ह्याचा विषय इतका गंभीर झाला की इथे निवडणूक लढवायची म्हटले की, अंगावर काटा येतो, असेही धस म्हणाले.