संभाव्य यादीत भाजपाकडून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, महाजन तर शिंदे गटाकडून उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे
संभाव्य यादीत बीडमधील कोणाचेच नाव नाही
मुंबई/सातारा (रिपोर्टर) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आता लवकरच म्हणजे येत्या रविवार किंवा सोमवारी मंत्री मंडळ विस्तार होईल, अशी माहीती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट असे दोघांचे मिळून किमान 25 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. यानंतर लगेच सोमवारपासून पुढे सात दिवसांचं अधिवेशसुद्धा घेण्यात येणार आहे. आता या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकार पाडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर शिवसेना आमदारांचा गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन तृतीयांश मंत्री असतील तर उर्वरित मंत्रिपदे शिंदे गटातील आमदारांना मिळतील, असं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 शिवसेना आणि 10 अपक्ष अशा 50 आमदारांचं पाठबळ आहे. चौघांच्या मागे एक, या सूत्रानुसार शिंदे गटाला एकूण 13 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद अशी एकूण संख्या आहे. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणार्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि आशिष शेलार या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे. तर शिंदे गटाकडून उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. नवीन मंत्रिमंडळात बीडमधून कोणाची वर्णी लागेल याकडे लक्ष लागून असले तरी संभाव्य यादीत कोणाचेच नाव नव्हते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले असून पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये पुन्हा बदल होऊ शकतो.