नेकनूर स्त्री रुग्णालयाला जिल्हा
शल्यचिकित्सकांची भेट; रुग्णांशी साधला संवाद
नेकनूर (रिपोर्टर) आपल्या कामात हयगय आणि निष्काळजीपणा करणार्या कर्मचार्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा देत नेकनूरचे रुग्णालय चांगले असल्याचे प्रशस्तीपत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिले. साबळे यांनी आज नेकनूर स्त्री रुग्णालयाला भेट देऊन तेथे काही रुग्णांनी त्यांनी चर्चाही केली. या वेळी त्यांच्या समवेत डॉ. आंधळकर, केजचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुरेश साबळे यांनी आज नेकनूर स्त्री रुग्णालयाला भेट देऊन तेथील काही वार्डातील रुग्णांशी संवाद साधला. कामामध्ये कुचराई करणार्या कर्मचार्यांना त्यांनी काही निर्देश दिले. रुग्णांची योग्य ती सेवा करा, आपल्या कामामध्ये कामचुकारपणा करू नका, अशा सूचना देत अनागोंदी कारभार करणार्या कर्मचार्यांविरुद्ध कारवाई करू, असा इशारा डॉ. साबळे यांनी दिला आहे. स्त्री रुग्णालयाची स्वच्छता आणि इतर सुविधा पाहता त्यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालयाबाबतीत कुठलीही अडचण असल्यास तात्काळ कळवा ती अडचण सोडविली जाईल, असे आश्वासन देखील डॉ. साबळे यांनी दिले. या वेळी त्यांच्या समवेत डॉ. आंधळकर व केजचे वैद्यकीय उपअधिक्षक यांची उपस्थिती होती.
आजच्या आज सोनोग्राफी मशीन
उपलब्ध करून दिली जाणार
रिपोर्टरच्या प्रतिनिधीने केला होता पाठपुरावा
नेकनूरच्या स्त्री रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन नसल्यामुळे रुग्णांना बीड येथे येऊन सोनोग्राफी करावी लागत असते. रिपोर्टरचे प्रतिनिधी अमजद पठाण यांनी याबाबत आरोग्य प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यातच आज डॉ. साबळे यांच्याकडे सोनोग्राफी मशीनची मागणी केली असता साबळे यांनी तात्काळ मशीन देण्याचे आश्वासन दिले. आज सायंकाळपर्यंत तुम्हाला मशीन मिळेल, असे साबळे यांनी म्हटले असून सोनोग्राफी मशीनमुळे रुग्णांची गैरसोय टळणार आहे.