रुग्णालयातील सीसीटीव्ही चेक करून दलालांवर कारवाईची मागणी
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गंभीर अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना येथे दर्जेदार सुविधा मिळत नाहीत, डॉक्टर वेळेवर नसतात असे म्हणून येथील काही दलाल खासगी रुग्णालयात रेफर करून कमिशन घेतात. हे दलाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला आणि येथील कर्मचार्यांना माहित असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे या दलालांना रुग्णालय प्रशासनाची मुकसंमती आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील सीसीटीव्ही चेक करून दलाली करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा रुग्णालय सर्वसामान्यांसाठी महागाईच्या काळात वरदान ठरत आहे. गंभीर-अतिगंभीर रुग्ण येथील दर्जेदार सुविधांमुळे ठणठणीत होऊन घरी जातात. जिल्हा रुग्णालयाचा दिवसेंदिवस रुग्णांमध्ये विश्वास वाढू लागला आहे. त्यामुळे शहरातील टोलेजंग खासगी रुग्णालयात काही रुग्ण फिरकत नसल्याने अशा रुग्णालयांनी जिल्हा रुग्णालयात 20 ते 30 टक्के दलाली देऊन दलाल नेमले आहेत. हे दलाल जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना येथे सुविधा मिळत नाही, डॉक्टर वेळेवर येत नाहीत, चार पैशाकडे पाहू नका, रुग्णाचा जीव महत्वाचा आहे, असे म्हणून नातेवाईकांना घाबरून खासगी रुग्णालयात रुग्णाला रेफर करण्यास नातेवाईकांना भाग पाडतात. अशा दलालांवर रुग्णालय प्रशासन मेहरबान असल्याचे दिसून येते. जिल्हा शल्यचिकित्सकांपासून वार्डबॉयपर्यंत हे दलाल कोण आहेत? त्यांना माहित आहे मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनच या दलालांना अभय देत असल्याचे दिसून येते.