नेकनूर, (रिपोर्टर)ः- नेकनूरची ग्रामपंचायत तालुक्यात सर्वात मोठी आहे. या ग्रामपंचायतसाठी निधी मोठ्या प्रमाणात येतो, ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वार्डात स्वच्छता ठेवणे हे ग्रामपंचायतचे कर्तव्य असते मात्र निवडून आल्यानंतर ग्रा.पं. सदस्यांना गावातील स्वच्छतेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. एकूणच ग्रामपंचायतचा कारभार म्हणजे निव्वळ सावळा गोंधळ आहे.
नेकनूरची ग्रा.पं.17 सदस्यांची आहे. ग्रामपंचायत अंतर्गत अनेक वार्ड असून या वार्डात जागो जागी अस्वच्छता दिसून येवू लागली. निवडणूकीमध्ये निवडून येण्यासाठी सदस्यांनी मोठ मोठे आश्वासन दिले होते. मात्र निवडूनआल्यानंतर सर्व सदस्यांना आश्वासनाचा विसर पडला. सदस्यांनी आपल्या वार्डातील समस्या जाणून घेवून त्या सोडविणे गरजेचे आहे. मात्र सदस्यांना समस्यांशी देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. स्वच्छता पाणी, नाली, रस्ते यासह अन्य समस्यांनी ग्रामपंचायतला घेरलेले आहे. अस्वच्छतेमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले. ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणीही स्वच्छता नाही. ग्रामपंचायतचा कारभार हा निव्वळ अनागोंदी आहे. त्यामुळे गावाचा विकास होत नाही. ग्रा.पं.सदस्यांनी गावच्या विकासासंदर्भात योग्य ती पावले उचलायला हवी होती. मात्र सदस्यांना गावाचा विकास करायचा नाही असे त्यांच्या वर्तणातून दिसून येत आहे. विकासाकडे सदस्यांनी पाठ फिरविल्याने गावकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
निष्क्रीय ग्रामसेवकाची बदली करा
ग्रामपंचायतच्या स्वच्छतेबाबत सरपंच व सदस्यांनी एकत्रित बसून ठोस निर्णय घ्यायला हवा मात्र तसे होत नाही. सरपंचाचा एक गट व सदस्यांचे इतर गट असा पध्दतीचा राजकीय कारभार सुरू आहे. वादा वादामुळे गावाची वाट लागू लागली. ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे ही ग्रा.पं.कडे लक्ष देत नसून त्यांची बदली करण्याची मागणीही केली जावू लागली आहे.