बीड (रिपोर्टर): आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी कालपासून सुरू आहे. आज बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस व गेवराई विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांनी आमदारकीची शपथ घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर कालपासून विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये आमदारांना शपथ देण्यात येत आहे. काल बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघातले परळी धनंजय मुंडे, माजलगाव प्रकाश सोळंके, केज नमिता मुंदडा यांनी आमदारकीची शपथ घेतली होती. आज विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी उर्वरित आमदारांचा शपथविधी सुरू आहे. सकाळी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आमदारकीची शपथ घेतली.