अखंड भारताच्या नकाशावर दोन-पाच हजार लोकसंख्येच्या अनेक वाड्या , तांडे आपल्याला पहायला मिळतील. परंतु गेल्या आठवडाभरापासून देशच नव्हे तर उभ्या जगाचं लक्ष एका वाडीकडे लागून आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या या वाडीने जगज्जेते समजू पाहणार्या दिल्ली तक्ताची अक्षरश: झोप उडवून टाकलीय. गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेतून अघोरी यश प्राप्त करून घेतले जाते, त्या यंत्रणेलाच या मारकडवाडी येथील जनतेने आव्हान दिलं आहे. ते आव्हान राज्यातलं सरकार आणि दिल्ली तक्त सहजासहजी पेलवू शकतं मात्र दिलं गेलेलं आव्हान हे सत्य स्वरुपातलं असेल, तर आपण पुरते नागवे होऊ. या भितीने दिल्ली तक्ताबरोबर महाराष्ट्राची सह्याद्रीही सध्या थरथरताना पहायला मिळते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरवाड्यामध्ये मतदान झाले, मतदानाची मोजणी झाली, निकाल लागला तेव्हा मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी आम्ही ज्यांना मते दिली त्यांना मते पडलीच नाही, असं म्हणत थेट मतदान यंत्रावर आक्षेप घेतला. दुधाचं दूध अन् पाण्याचं पाणी करण्यासाठी या गावातील नागरिकांनी थेट बॅलेट पेपरवर मतदान घेऊन गावाची परीक्षा घेण्याचे ठरवले. तशी माहिती त्यांनी स्थानीक प्रशासनाला दिली, मात्र कायद्याचा बडगा उगारत स्थानीक प्रशासनाने मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया बंद पाडली. ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहून शंभर-दोनशे ग्रामस्थांविरोधात आणि तेथील आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला. प्रश्न असा आहे, या मतदारसंघात निवडून आलेला आमदार ही
सत्वपरीक्षा
देण्यासाठी तयार झाला आहे. मारकडवाडीचं म्हणणं एवढच आहे, त्यांनी ज्या उमेदवारासाठी मतदान दिले ते उत्तम जानकर खरं तर निवडून आले आहेत, तरीही मारकडवाडी ज्या पद्धतीने उत्तम जानकरांना कमी मतं पडले आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीच्या उमेदवाराला जास्त मते पडली ही गोष्टच मारकडवाडीच्या ग्रामस्थांना मान्य नाही. आम्ही उत्तम जानकरांना मतदान केले मग महायुतीच्या उमेदवाराला मते गेलीच कशी? असं म्हणत गावकरी आम्हाला आमच्या गावची परीक्षा पुन्हा घ्यायचीय म्हणत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी हट्टाला पेटले. खरं पाहिलं तर उत्तम जानकर निवडून आले आहेत, त्यांना पाच वर्षे तरी हा रिकामा खटाटोप करण्याची गरज नाही, परंतु गावकर्यांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत गंभीर आहे. देशाच्या मतदान यंत्रणेला थेट आरोपीच्या पिंजर्यात उभं करणारा आहे. मतदान यंत्रणेबद्दलचा संशय अधिकतेने दृढ करणारा आहे. त्यामुळे उभा देश नव्हे तर जगाचं लक्ष मारकडवाडीकडे सध्या तरी पहायला मिळते. एकीकडे जगभरातल्या बहुतांशी देशांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान बहिष्कृत केले आहे, दुसरीकडे भारताचे सत्ताकेंद्र मात्र ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया घेण्यास हट्टाला पेटले आहे, अशा स्थितीत मारकडवाडीने हा सुर्य आणि हा जयद्रथ दाखवण्याचा प्रयास आपल्या मागणीतून केल्याचे दिसते.
शितावरून भाताची परीक्षा
शितावरून भाताची परीक्षा करणे म्हणजे छोट्या गोष्टींवरून मोठ्या गोष्टीचा अंदाज लावणं. त्याच मोठ्या गोष्टीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न मारकडवाडी जणू करते. मारकडवाडीच्या नागरिकांचं म्हणणं गांभीर्याने घेतलं आणि याठिकाणी बॅलेट पेपरवर दुसर्यांदा मतदान घेतले तर नक्कीच सत्ताधार्यांना आणि दिल्ली तक्ताला मोठी डोकेदुखी वाढेल. ज्या हट्टाने आणि ज्या आत्मविश्वासाने मारकडवाडीचे नागरीक मतदान घेण्यासाठी उत्सुक आहेत तो आत्मविश्वास पाहिला तर नक्कीच त्याठिकाणी मतदानाच्या आकडेवारीत काही तरी घपला झाला, हे मानायला पर्याय उरतो. त्यामुळेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार मारकडवाडीच्या मागणीने धास्तावले आहेत. एवढं सर्व करूनही एकतर याठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला नाही, त्याठिका शरद पवारांच्या गटाचा उमेदवार निवडून आला, फक्त मारकडवाडी आम्ही मतदान महायुतीच्या उमेदवाराला केलेच नाही, हे छातीठोकपणे सांगत असेल आणि ते बॅलेट प्रक्रियेतून सिद्ध होत असेल तर ईव्हीएम बाबत जो देशभरातला संशयकल्लोळ आहे तो नुसता संशय नव्हे तर सत्य समजले जाईल आणि मतदान यंत्रणेत घोळ होतो हे सिद्ध होईल. त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करायला बहुदा राज्य सरकार म्हणण्यापेक्षा भाजप तयार नाही. परंतु मारकडवाडीच्या मागणीने पुन्हा एकदा भाजपकडे संशयित नजरेने पाहिले जाते, हेही तेवढेच खरे.
सत्य काय?
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानले नाही बहुमता, सत्य काय असत्य काय हे आम्हाला माहितेय, त्यामुळे लोक काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतात याला महत्व नाही, असं जर भाजपाचं म्हणणं असेल आणि भारतीय जनता पार्टी निर्मळ मनाची असेल तर मारकडवाडीतील ग्रामस्थांची मागणी पुर्णत्वास न्यायला काहीच हरकत नाही. परंतु भाजप अनेकदा संशयकल्लोळ निर्माण करतं आणि त्या संशयकल्लोळातून आपला लोभाचा गोळा काढून घेतं. हे अनेक राज्यातल्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या व्यूहरचनेतून दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हिंदू विरुद्ध मुस्लिम चाललं नाही, दलित-संवर्ण चाललं नाही, मग मराठा विरुद्ध ओबीसी ही वातावरण निर्मिती आणि मोठ्या समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण, छोट्या समाजाच्या मताचं एकीकरण करत भाजप आपली मताची टक्केवारी यथायोग्य स्थितीत आणतं. हे खरं मानलं तर मग मतदान यंंत्रणेबाबतचा संशयकल्लोळ का? हा जसा प्रश्न उपस्थित होतो तसाच विरोधकांबाबत दुसरा प्रश्न उपस्थित केला जातो. म्हणजे जेव्हा विरोधक जिंकून आले, तेव्हा ईव्हीएमबाबत संशय नसतो, परंतु जेव्हा भाजप जिंकून आले तेव्हा ईव्हीएमबाबत शंका घेतली जाते, याचं उत्तर निटपणे विरोधकांनाही देता आलेलं नाही. परंतु अनेक अभ्यासकांचं, विश्लेषकांचं आणि अनुभवी नेत्यांचं म्हणणं हे येतं, भाजपाला जे राज्य हवं असतं ते त्यांच्याकडे घेतात आणि जे राज्य छोटं असतं ते विरोधकांना देतात. याच्यात सत्य किती आणि असत्य किती हा नंतरचा भाग. परंतु मारकडवाडीने जो लढा आता उभा केलाय, तो सार्थकी लागला तर नक्कीच त्या लढ्यातून सत्य आणि असत्य बाहेर येईल. तिथेच
दिल्ली तक्त
मारकडवाडीला घाबरत तर नाही? कारण काल-परवा शरद पवारांनी कोणाला किती मतदान पडले आणि कोणत्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले याचा हिशोब मांडला. तसा हिशोब देवेंद्र फडणविसांनीही लोकसभा निवडणुकीदरम्यान पडलेल्या मतातून शरद पवारांना दिला. मारकडवाडीत जे शरद पवारांचे आमदार उत्तम जानकर हे निवडून आले आहेत ते बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी थेट राजीनामा द्यायला तयार आहेत. या सर्व घटनाक्रमाचे पडसाद आता राज्य आणि देश पातळीवर उमटताना दिसणारच आहे. कारण आज दस्तुरखुद्द शरद पवारांनी मारकडवाडीला भेट देत दिल्ली तक्ताला आव्हान दिलंय, सत्ताधार्यांना उत्तर दिलय. काँग्रेसचे नेते राहुल गांधीही या मारकडवाडीला भेट देणार आहेत. इथूनच ईव्हीएम विरुद्धच्या ठिणगीला हवा देणार आहेत. मारकडवाडीची मागणी किती खरी किती खोटी हे मतदान प्रक्रियेनंतरच पहायला मिळणार आहे, परंतु तत्पूर्वी जर स्वत:ला छप्पन इंचच्या छातीचा कोणी लोहपुरुष मानत असेल, सत्य – कायदा, माणूस धम याला जर खरचं भारतीय जनता पार्टी मान-सन्मान देत असेल तर मारकडवाडीचा विषय संपुष्टात आणत दिल्ली तक्ताने त्या तक्ताचा मान राखावा आणि मतदान यंत्रणेबाबतचा संशयकल्लोळ दूर करावा.