बीड (रिपोर्टर): बांगलादेशात हिंदूधर्मिय बांधवांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात जागतिक स्तरावर मानवाधिकाराच्या माध्यमातून न्यायाची प्रतीक्षा असल्याचे सांगत बांधवांवर होणार्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आज बीड, परळी आणि वडवणी येथे निषेध मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बीड, परळीत सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश करून बांगलादेशात हिंदुंना वाचवाची गुहार देण्यात आली.
बीड शहरातील सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रॅली काढत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. बांगलादेशात हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण करण्याबाबत भारत सरकारने कठोर शब्दामध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवत योग्य पावले उचलावीत, इस्कॉनचे चिन्मया कृष्ण महाराज व त्यांच्या सहकार्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, हिंदू महिलांवर होणारे अत्याचार तात्काळ रोखावेत, समाज माध्यमे आणि समाजात होत असलेले धार्मिक उत्पीडन तात्काळ थांबवावे, अशा आशयाची मागणी बीडमध्ये सर्वपक्षीयांकडून करण्यात आली तर परळीमध्ये जनआक्रोश मोर्चा आज सकाळी काढण्यात आला. राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी हिंदू समाज एकत्रित आला. या ठिकाणी निषेधाच्या घोषणा देत व्यापार्यांनी बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवली. तिकडे वडवणी याठिकाणीही सर्वपक्षीय हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.