मस्साजोग (रिपोर्टर): पंधरा वर्षापासून सरपंच राहिलेले संतोष देशमुख हे गावची सेवा करायचे. अशा कर्तृत्ववान तरुणाची बीडमध्ये निर्घृणपणे हत्या होते, पोलीस बघ्याची भूमिका घेतात, इथलं पशासन कुणाच्या तरी हातातलं बाहुलं बनलय. पोलिसांनी मनावर घेतलं असतं तर संतोष देशमुख यांचा खून रोखता आला असता. पोलिसांच्या या कार्यप्रणालीमुळे इथल्या पीआयवरही गुन्हे दाखल करा, अशा आशयाची मागणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
शिवसेनेचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मस्साजोग येथे भेट दिली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी माध्यमाशी बोलताना दानवे म्हणाले, इथलं प्रशासन कुणाच्या तरी हातातलं बाहुलं बनलेलं आहे. संतोष देशमुख यांचा हृदयद्रावक खून पोलीस प्रशासनाला रोखता आला असता इथे ज्या गोष्टी कानावर येतात त्यावरून आरोपी आणि पोलीस मिळालेले आहेत, इथे काही लोकांची दादागिरी, मस्ती इतकी वाढलेली आहे की, पोलीस सुद्धा काही करू शकत नाहीत, हे निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं आहे. केज पोलीस ठाण्याच्या पीआयवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या वेळी दानवेंनी केली. यातील सर्व आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत. महाराष्ट्र पोलीस गतीमान पोलीस म्हणून ओळखली जाते, मात्र बीड जिल्ह्यातील पोलीस या प्रकरणात कासवगतीने काम करत आहे. तो तपास गतीमान व्हावा आणि यातल्या प्रत्येक दोषीवर कारवाई व्हावी, अधिवेशन तोंडावर आहे, आम्ही हे प्रकरण अधिवेशनात लावून धरणार असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले.