गणेश सावंत
मो. नं. 9422742810
गांधींनी देशाचे तुकडे केले, नेहरुंनी देशाचं वाटोळं केलं, गांधी म्हणजे घराणेशाही, त्यांच्या 70 वर्षांच्या कालखंडात देशात काहीच झालं नाही. मोदी म्हणजे सर्वस्व. पहा जगामध्ये भारत कसा बलशाली दिसतोय. राम मंदिर कुणाला करता आलं नाही ते मोदींनी केलं. देशात सर्वात उंच पुतळा बनवला तो मोदींनी बनवला. काश्मिरमधील 370 कलम हटवले. मोदींचं राजकारण म्हणजे देशप्रेम. मोदींमुळेच राष्ट्रप्रेम जागे झाले. असे एक ना अनेक उदाहरणे आणि मोदींना बिरुदावली देत भक्तजण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जय जयकार करत आहेत. असो, इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संविधानातली लोकशाही आहे. त्यामुळे भक्तांच्या या प्रेमाबद्दल व्यक्त होण्याचा अथवा त्यांना विरोध करण्याचे कारण नाही. परंतु राजकारण करताना जिथं समाजकारणाची गरज असते, लोकांच्या मुलभूत सुविधा सोडवण्याची गरज असते, सर्वसामान्यांच्या जान आणि मालची सर्वस्वी जबाबदारी सत्तेत असलेल्यांवर असते. त्याचं भान राजकारण्यांना म्हणण्यापेक्षा सत्ताकारण करणार्यांना असायला हवे असते. ते इथे दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये विकासाची काय कामे झाली? हा प्रश्न भक्तांना विचारला तर सरळसरळ त्यांच्याकडे एकच उत्तर पहायला मिळतं ते म्हणजे पहा ना, देशामधले रस्ते कसे होत आहेत, हायवे कसे झाले आहेत, मान्य आहे. नितीन गडकरी यांच्याकडे जे खाते आहे त्या सड़क परिवहन आणि राजमार्ग तथा पोत परिवहन खात्याअंतर्गत देशात जे कामे झाले ते यथायोग्यच. हे खाते वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्र्यांकडे असलेल्या खात्यातून असा एक प्रकल्प सांगा जो गांधी आणि नेहरुंच्या तोडीचा आहे. हा सवाल नक्कीच करावा लागेल, कारण गेल्या आठ वर्षांच्या कालखंडामध्ये देशात धर्म, जात आणि मंदिराच्या नावावर जेवढे सत्ताकारण झाले तेवढे विकासाच्या नावावर राजकारण झालेच नाही. आजचं राजकारण हे केवळ सत्ताकारण आहे. त्यामुळे आपल्याला असे सत्ताकारणाचे समीकरण जुळवणारे राजकारण नको. म्हणून कधी कधी वाटतं,
राजकारण सोडावं
नितीन गडकरींचे हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशभरात जे सत्ताकारणाचं राजकारण सुरू आहे त्याला चपराक देणारं आहे. राजकारण कसं असावं, समाजाचं हित जोपासणारं, सामाजिक परिवर्तन करणारं, विचाराला साथ देणारं, कुविचारांवर प्रहार करणारं, पर्यावरण, शिक्षण, कला, नाट्य, शेती, रोजगार यासह अन्य विषयांना हात घालत त्या विषयातील अडचणी दूर करणं त्याला राजकारण म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले गडकरी आपल्या खात्याअंतर्गत लोकहिताचे काम करतात, रोज शेकडो किलोमीटर देशभरात रस्ते करतात. त्या व्यक्तीला आजच्या राजकारणावर व्यक्त होताना हे राजकारण नसून सत्ताकारण आहे, असं जेव्हा वाटायला लागतं अन् अशा या सत्ताकारणाच्या राजकारणामध्ये आपण नसावं, राजकारण सोडून द्यावं असं जेव्हा जाहीरपणे व्यक्त व्हावे लागते तेव्हा ज्या मंत्रिमंडळामध्ये तो व्यक्ती काम करतो ते मंत्रिमंडळ आणि त्या मंत्रिमंडळाचा म्होरक्या हा लोकहिताला नव्हे तर स्वत:ला आणि सत्ताकारणातून हुकुमशाहीला अधिक महत्व देतो हे यात स्पष्ट होते. आम्ही गडकरींचं काल-परवाचं ते भाषण ऐकलं, त्या भाषणात गडकरींनी राजकारणाची व्याख्या स्पष्टपणे सांगितली.
गडकरींची व्याख्या
त्यांच्याच शब्दात सांगायची झाली तर.. गडकरी म्हणाले, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता 100 टक्के सत्ताकारण झालं आहे, मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, अशी भावनाही नितीन गडकरी यांनी या वेळी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, आपलं सामाजिक आणि राजकीय जीवन समृद्ध व्हावं, त्यात दर्जात्मक बदल व्हावेत यासाठी व्यक्ती आणि नेतृत्वात गुणात्मक बदल झाला पाहिजे. गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. विचारांमधून, थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशी आपली संस्कृती आहे. माझं कल्याण व्हावं असं आपल्या संस्कृतीत लिहिलेलं नाही, हे वक्तव्य करून सत्ताकारणाच्या मागे लागलेल्या लोकांना बहुदा हा चिमटा असावा. माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणार्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं, असंही गडकरी म्हणाले. गडकरींच्या या भाषणातून सध्याच्या राज्यकर्त्यांबाबत बरच काही बोलल्याचं दिसून येतं. जो सद्सद्विवेक बुद्धीने राष्ट्रप्रेमी आहे, देशप्रेमी आहे, दिनदुबळ्या, गंजलेल्या, पिचलेल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्याविषयी आपुलकी आहे त्याला आजच्या राजकारणाची खरी व्याख्या समजेल आणि ती खरी व्याख्या गडकरींना नक्कीच उमजून आली. मोदींच्या कार्यकाळात
देशातली महागाई
अक्षरश: सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोझर फिरवणारी आहे. इतिहासात कधी नव्हे एवढा रुपया घसरला आहे. गेल्या सत्ता वर्षांच्या कालखंडामध्ये जिथं कधीही गंगाजळीला कोणी हात घातला नाही, तिथं या सरकारने गंगाजळी बाहेर काढली. जिथं पिठावर कधी कर लादला गेला नाही तिथं मिठावर अन् पिठावर आज कर लादला गेला. महागाईच्या व्याख्या समजून घ्यायची असेल, तर जो कष्टाने पैसे कमवतो आणि घर चालवतो त्यांना आजच्या महागाई बाबत विचारा. ज्याला हरामीचे पैसे येतात, भ्रष्टाचाराचे पैसे येतात त्याला महागाईबाबत काही वाटत नसेल, कारण पन्हाळा वाटं येतं अन् म्होरी वाटं जातं. त्या पैशात समृद्धी नक्कीच असेल, परंतु समाधान नक्कीच नाही. आज देशामधली कुठलीही अशी वस्तू नाही की त्या वस्तूची किंमत वाढली नाही. हो, परंतु हीच महागाई शेतकर्याच्या शेतमालाला कधीच दिसून आली नाही. तोच शेतकर्याचा शेतीमाल जेव्हा अदानी, अंबानींच्या गोडाऊनमध्ये जातो तेव्हा मात्र त्या शेतीमालाला सोन्याचा भाव येतो हेही तितकच खरं. मोदींच्या राज्यात जेव्हा सत्ताकारणाचं सुत्र चालतं तेव्हा देशाचं अर्थकारण बिघडतं. कारण सत्ताकारणासाठी लाचार राजकारण्यांना खरेदी करताना आर्थिक घोडाबाजार आणि तो अर्थार्जनाचा डोंगर भ्रष्टाचाराच्या शिष्टाचारातून उभा केला जातो आणि त्याचा भार सर्वसामान्यांवर पडतो. आजचं राजकारण जसं सत्ताकारण होऊन बसलं आहे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्म, जात, मंदिर, मस्जिद यावर लोकांचं लक्ष केंद्रित करत असताना भक्तांचा जयजयकार पाहता इथं
दुबळ्यांचं काय?
असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर येतो. महात्मा गांधींची अहिंसा डोळ्यासमोर तरळते अन् दुबळ्यांचीही एक ताकद असते. मोर्चे, मिरवणुका, निषेध, संप, उपोषण यांतून ज्या शक्तीचे प्रदर्शन होते ते असे असते. दलित, आदिवासी, कामगार, शोषित व पीडितांचे वर्ग आपली ताकद संघटनेतून उभी करतात आणि प्रसंगी ते सत्तेला प्रभावितही करीत असतात… एक प्रभाव नीतीचाही असतो. गांधीजी निःशस्त्र होते, देहाने दुबळे होते; पण त्यांच्या आत्म्याचे बळ मोठे होते. त्यांच्या उपोषणापुढे केवळ ब्रिटिशच वाकत नसत, देशही झुकत असे; धर्मांधांना आवर बसे आणि हिंसाचारावर आलेली माणसे हातातली शस्त्रे खाली टाकत. त्यांच्या एका उपोषणाने तोवर बंद असलेली देशभरातील हिंदूंची सगळी मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली. शक्ती वा प्रभाव यांचा हा सगळ्यात देखणा व विनम्र करणारा प्रकार आहे… तात्पर्य- शक्तीसारखेच नीतीनेही राजकारण साधता येते. हे याठिकाणी एवढ्यासाठीच सांगायचे, जो देशाभिमानी आहे, लोकहितवादी आहे तोच इथे सत्य बोलू शकतो. सत्तेसाठी काहीही बोलणारे धर्म, जात, पात, पंथाला सोबत घेऊन सत्ताकारणाचं गणित जमवणार्यांना गांधी कधी कळणार नाहीत, महाराजांचं स्वराज्य समजून घेता येणार नाही, हे त्रिवार सत्य असले तरी अशा लोकांच्या काफिल्यातही नितीन गडकरीसारखे स्पष्ट बोलणारे नितीवान सत्तेपेक्षा सत्याला महत्व देणारे नेते आहेत. आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे, कारण ते महाराष्ट्रातले आहेत. गडकरींनी राजकारण सोडण्यापेक्षा पक्षात झालेल्या सत्ताकारणाच्या नशेवर उपाय शोधावा. आज गडकरींना सत्ताकारणातलं राजकारण उमगलं, आता समाजकारणातलं सत्य त्यांनी इतरांना समजून सांगावं.