नवी दिल्ली (वृत्तसेवा) शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा संघर्ष पहायला मिळतो आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलं असून आयोगानं यामध्ये दोन्ही दावेदारांना महत्वाचे निर्देष दिले आहेत. आयोगाच्या या निर्देशांविरोधात आता उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांना ८ ऑगस्टपर्यंत पक्षाबाबतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे जाईल याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाल याबाबत निर्णय घेण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात केली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात खटला सुरु असताना निवडणूक आयोग निर्णय देऊ शकत नाही, असंही ठाकरेंच्या याचिकेत म्हटलं आहे.