शिवसेनेला चोहीकडून खिंडीत गाठण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. माजी मुख्यंमत्री उध्दव ठाकरे हातबल झाले पाहिजेत असं जाळं टाकण्यात आलं. शिवसेनेची झालेली ही वाताहात पाहता भाजपाला अतिआनंद झाला. ज्यांनी शिवसेना फोडली ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केला. त्यांचा हा दावा कितपत टिकतो हे 8 ऑगस्टला समजेल. पक्षांवर दावा करण्याचा प्रकार म्हणजे ज्या झाडाखाली बसून आपण मोठं झालोत, ते झाडचं आपलं आहे असं म्हण्यापर्यंत मजल जाणं हे काही चांगल्या विचाराचं लक्षण नाही. राजकारणात वाद, विवाद असावेत पण इतका वाद असु नये की, ज्यांच्या सोबत राहून मोठं झालात, त्यांच्या झोपेत धोंडा घालणं हे भारतीय संस्कृतीला न पटणारी बाब आहे. शिवसेनेचा एक, एक माणुस शिंदेंचा होत आहे. ‘मुळ शिवसेना राहत नाही’, अशी अफवा शिंदे गटाकडून सोडली जावू लागली. ‘सत्तेत या आणि आपला फायदा करुन घ्या’ असं ही बंडखोरांकडून शिवसेना नेते आणि त्यांच्या समर्थकांना आश्वासन दिले जात असेल, म्हणुनच शिवसेनेचे नेते, शिंदे गटात सहभागी होवू लागले. काहींना ईडीची भीती आहे. ज्यांना काल पर्यंत ईडीची नोटीस येत होती. आता त्यांना ईडीची नोटीस येणार नाही. भावना गवळी, अर्जुन खोतकर हे ईडीच्या नोटीसीमुळे परेशान होते. आज ते शिंदे यांच्या सोबत असल्यामुळे त्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे. महान समाजसेवक किरीट सोमय्या आता भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणार नाही. त्यांची समाजसेवा संपली? जेव्हा पासून राज्यात सत्तांतर झालं. तेव्हा पासून सोमय्या गायबच झाले. त्यांच्या तोंडातून कुठलाही शब्द निघेना. महाआघाडीचं सरकार पाडण्यासाठीच सोमय्या कामाला लागले होते का? सरकार पडले, मुख्यमंत्री ठाकरे पायउतार झाले. त्यामुळे राज्यातील भ्रष्टाचार संपला आहे असं दिसून येत आहे?
भाजपाच्या विरोधात हाबुक ठोकणारे…
शिवसेनेतील गुलाबराव पाटील, केसरकर व अन्य काही नेते भाजपावर तोफा डागत होते. भाजपाकडून कसा अन्याय केला जात आहे. याचा पाढा वाचत होते. आज तेच नेते भाजपा किती चांगला आणि शिवसेनेचं नेतृत्व कसं वाईट वागत होतं याचे पाढे वाचून दाखवू लागले. सत्तेच्या जवळ गेल्या नंतर माणुस किती प्रमाणात बदलू शकतो हे राज्यातील घडलेल्या सत्तांतरावरुन दिसतं. ज्यांना कुणी ओळखत नव्हतं. अशा वेळी शिवसेनेनेे अनेकांना आपल्या जवळ करुन नेतृत्व करण्याची संधी दिली, मोठं केलं, आमदार, खासदारकीपासून ते मंत्री केलं, तेच आज शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्यासाठी तयार झाले. स्वकीयाकडून इतका मोठा धोका निर्माण होईल याचा विचार कधी ही ठाकरे यांनी केला नव्हता,राज्यात सत्तांतर घडल्यांनतर मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला. नवीन राज्यकर्त्यांना राज्यातील जनतेचं काही देणं,घेणं नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुबंई, दिल्लीच्या वार्या करुन दिल्लीची मर्जी राखण्या शिवाय दुसरं काहीच करत नाही. जे काही नेते शिवसेनेत आहेत, ते नेते ही शिंदे यांच्या सोबत जाण्याच्या अवस्थेत आहेत. अर्जुन खोतकर हे दिल्लीत शिंदे यांना भेटले होते. त्याची बातमी मीडियात आल्यानंतर खोतकर यांनी आपण फक्त शिंदे यांना नमस्कार केल्याचे सांगितले. आता खोतकर शिंदे यांच्या सोबत गेल्याची बातमी मीडियात आली. शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतर खोतकर म्हणतात, ‘मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक’, सच्चा शिवसैनिक दगाबाज असू शकतो का? दिल्लीत गेलेला नेता शिंदे गटात जातो. याचा अर्थ काय? शिवसेनेच्या नेत्यांना जबरदस्तीने नेले जात आहे की, त्यांना भीती दाखवली जाते?
ठाकरे यांचे आवाहन
शिवसेनेचा वाद कोर्टात गेला. त्यामुळे नेमकं जिंकतं कोण याकडे लक्ष लागून आहे. पक्षावर दावा केल्याने ठाकरे चांगलेच पेचात पडले. उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने या निमित्ताने त्यांनी शिवसैनिकांना साद घातली. ‘मला द्यायची असेल तर सदस्य नोंदणीच्या अजार्च गठ्ठे आणि पदाधिकार्यांच्या शपथपत्राचे गठ्ठे द्या’! असे आवाहन करण्यात आले. एका पक्षप्रमुखांवर इतकी वाईट वेळ यावी हे पहिल्यांदाच घडत आहे. उध्दव ठाकरे हे साधे सरळ मनाचे म्हणुन परिचीत आहेत. त्यांचा साधा स्वभावच नडला असावा. आज पर्यंतच्या राजकारणात ठाकरे यांनी कधी कोणाला वाईट बोलून दुखावलं नाही, किंवा कुणाशी ते वाईट वागले असतील असं वाटत नाही. ज्यांनी पक्ष फोडून ठाकरे यांना आव्हान दिले. तीच हिंमत बंडखोरांनी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यात असतांना दाखवली असती का? आज बंडखोर बाळासाहेबांचं नाव घेवून लोकांची दिशाभूल करतात म्हणजे लबाड किती लबाड असू शकतात हे यातून दिसून येत आहे. गुरुपोर्णिमेला बंडखोर स्व. बाळासाहेबांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. शिवसेना फोडणारांना बाळासाहेबांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का? आम्ही तुमची शिवसेना उध्दवस्त केली असं तर म्हणण्यासाठी बंडखोर स्मारकासमोर गेले नव्हते ना? बंडखोरांना बाळासाहेब काय आर्शीवाद देतील? बाळासाहेबांच्या वेळी अशी शिवसेना नव्हती, पण उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना बदलली असं ही टुमणं बंडखोर उठल्या बसल्या लावत असतात. पुर्वीच्या शिवसेनेत आणि आताच्या सेनेत काय बदल झाला? नाचता येईना म्हणुन अंगण वाकडं म्हणाचयं, अशीच म्हणण्याची वेळ आली. शिवसेनेने दोन्ही काँग्रेस सोबत सत्तेत भागीदारी केली म्हणुन भाजपाचा जळफळाट झालेला आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने बंडखोर बोलत आहे. बंडखोरांचा इतिहास उज्जवल असतो, असं नाही. बंडखोरांना भविष्यात त्याची किंमत चुकवावी लागते. आज पर्यंत ज्यांनी, ज्यांनी शिवसेना सोडली, त्याचे नंतर बेहाल झाले. अशीच अवस्था बंडखोरांची झाली तर नवल वाटायला नको.
कार्यकर्ते सोबत
नेते स्वार्थासाठी बदलत असतात. आजच्या नेत्यांचा काही भरोसा राहिला नाही. प्रत्येक निवडणुकीत अनेक नेते, इकडून, तिकडे पळण्याचं काम करत असतात. निष्ठावंत एखादाच नेता असतो. इतराबाबत बोलावं तितकं कमीच आहे. राजकारण नालीतील घाणीसारखं झालं. पुर्वी राजकारणाला एक प्रतिष्ठा होती, आज ती राहिली नाही. स्वार्थी लोकामुळेच राजकारण बदनाम झालं. कोणताही पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होत असतो. कार्यकर्त्यांना विचारात न घेता नेते पक्ष बदलतात, म्हणजे हा कार्यकर्त्यांवर अन्याय नाही का? काल विरोधी पक्षासोबत निवडणुका लढवलेल्या असतात, आज त्याच पक्षासोबत हातमिळवणी करणं हा गोंधळ वाटत नाही का? आपल्या नेत्याला निवडुन आणण्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात. आपल्या नेत्याच्या खांद्यावर विजयाची पतका फडकवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी कार्यकर्त्यांची असते. निवडणुकीतून दाखल झालेले गुन्हे स्वत:च्या नावावर घेणारे कार्यकर्ते राज्यात सगळ्याच पक्षात असतात. विरोधकांची दुष्मनी देखील कार्यकर्ते घेत असतात, ते फक्त नेत्याच्या प्रेमापोटी, अनेक वेळा भाजपाच्या विरोधात बंडखोर शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुक लढवली. आता शिवसेनेचे बंडखोर भाजपाकडे गेल्याने कार्यकर्ते गोत्यात सापडले. निवडणुकीत एकमेकांवर राग करणारे आता मनोमिलन करुन स्वागत करणार का? आजच्या राजकारणाची स्वार्थी चाल पाहून कार्यकर्त्यांनी सावध भुमिका घेणे गरजेचे आहे. आपला नुसताच वापर होतो का? याचं आत्मचिंतन कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. शिवसेनेचे बंडखोर बाहेर पडले, पण शिवसेनेचा जो मुळ गाभा आहे, कार्यकर्त्यांचा तो अजुनही ठाकरे यांच्या सोबत आहे. बंडखोरी केल्यानंतर किती उसणं अवसान आणलं पाहिजे, हे ही बंडखोरांना कळेना. मुख्यमंत्री बंडखोरीला ‘क्रांतीची’ उपमा देत आहेत. आम्ही क्रांती केली असं ते जाहीर सभेत बोलत असतात. बंडखोरीला क्र्रांती म्हणणं हा ‘क्रांतीचा’ अपमान नाही का?
शिवसंवाद मेळावे
जे गेले, ते गेले, आणि जे आहेत, ते आपले असचं राजकारणाचं सुत्र असतं. राजकारणात किती नुकसान झालं तरी पुन्हा नव्याने सुरुवात करायची असते. अनेक नेत्यांना आज पर्यंत राजकरणात नुकसान सहन करावं लागलं. शुन्यातून विश्व निर्माण करता आलं पाहिजे. शिवसेना आज संकटातून जात असतांना माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सेनेला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करु लागले. एक, एक नेता,कार्यकर्ता जवळ करु लागले. ज्यांना, अति जवळ केलं त्यांनी धोका दिला, म्हणुन आता माणसं पुन्हा जोडून त्यांना मोठं करण्याचं काम ठाकरे यांच्यावर आहे. नुसतं मीडीयात बोलून काही फायदा होत नसतो. लोकांत जावून काम करणं हे गरजेचं झालं. शिवसेनेचा राज्यात विस्तार आहे. अगदी वाडी, वस्त्यावर शिवसेना पोहचलेली असून शिवसैनिकांना साद घालण्याचे काम आदित्य ठाकरे करु लागले. आदित्य ठाकरे यांनी ‘शिवसंवाद’ मेळावे घेतले. राज्यातील काही प्रमुख शहरात त्यांचे मेळावे पार पडले. मेळाव्याला ओसांडून गर्दी पाहावयास मिळाली. ‘नेते गेले हारकत नाही, आम्ही कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहोत असं जमलेल्या गर्दीतून दिसून आलं’. शिवसेना हा ‘वाघांचा’ पक्ष आहे, तो तसाच राहावा यासाठी ठाकरेंना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार. शिवसेनेला पुन्हा रुळावर आणण्याचं मोठं आव्हान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर आहे, ते येणार्या अडचणीवर कसे मात करतात आणि शिवसेनेला किती प्रमाणात उभारी देवून यशस्वी करतात, हे येत्या काही दिवसात दिसेलच.