मुंडे भाऊ-बहिणीची वर्चस्व सिध्दीची सराव परिक्षा; आष्टी-पाटोदा अण्णांचा की काकांचा? आ.प्रकाश सोळंकेंना आव्हान कोण देणार? पंडितांच्या लढाईत पवारांना किती महत्व? जयदत्त क्षीरसागरांच्या चुप्पीत दडलंय काय?
बीड (रिपोर्टर) विधानसभा निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणार्या आणि पक्षाला नव्हे तर व्यक्तीला महत्व असणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत झेडपी च्या अंगणात यावर्षी मानाचे कंगन कुणाला मिळणार? याची उत्सुकता असली तरी राज्यातील राजकीय पक्षांची अस्थिरता पाहता बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांमध्ये थेट भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत असली तरी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला या निवडणूकीत अनन्य साधारण महत्व असल्याने परळी, अंबाजोगाई, केज विधानसभा मतदार संघात मुंडे भाऊ बहिणीला आपले वर्चस्व सिध्दीस दाखवावे लागणार आहे. तर इकडे आष्टी,पाटोदा अण्णांचा, काकांचा की साहेबाचा…याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेवराईत पंडितांना लक्ष्मण पवार रोखणार का? या प्रश्नाचे उत्तर जनता मतदानातून देणार आहे. माजलगाव, धारू, वडवणी तालुक्यात प्रकाश दादांच्या दबदब्याला कोण आव्हान देणार? अन बीडमध्ये भाऊ बंदकीच्या राजकारणावर शिरजोर होत नवनेतृत्व तयार होणार का? अशा एक ना अनेक प्रश्नाचे उत्तर या निवडणूकीतून मिळतील.
बीड जिल्हा परिषदेच्या 69 जागांसाठी काल आरक्षण सोडत पार पडली. त्या पाठोपाठ विधानसभेची रंगीत तालिम म्हणून पाहिल्या जाणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत आपलाच वरचष्मा रहावा यासाठी तालुक्याचे नेतृत्व करणारे सर्वच पक्षाचे नेते कामाला लागत इच्छूकांच्या बहुगर्दीत विजयाचे शिलेदार शोधू लागले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही पक्षापेक्षा नेतृत्व करणार्या व्यक्तीला महत्व देणारी आहे. म्हणूनच विधानसभेची रंगीत तालिम म्हणा अथवा सराव परिक्षा म्हणून ही निवडणूक प्रत्येक नेतृत्व ताकदीने लढते. बीड जिल्ह्याच्या राजकारणात नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा ठेवणार्या मुंडे भाऊ बहिणीला आपले राजकीय अस्तित्व अटकेपार ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्यामध्ये महत्व प्राप्त करून घेणे अधिक महत्वाचे. म्हणूनच परळी, अंबाजोगाई, केज या तीन तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 21 जागा लढवाव्या लागतात. माजीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सरळ लढतीमध्ये ताकद दाखवतील. धनंजय मुंडे यांची कार्यपध्दत या तिन्ही तालुक्याला आपलीशी वाटते. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी या तीन तालुक्यातील जास्तीत जास्त उमेदवार हक्काचे असतील. इकडे राष्ट्रवादीचेच आ.प्रकाश सोळंके हे माजलगाव, धारूर, वडवणी या तीन तालुक्यात वर्चस्व ठेवून आहेत. त्यांना म्हणावा तसा विरोधक
या तीनही तालुक्यातून अद्याप आव्हान देणारा दिसून आलेला नाही. या तीन तालुक्यात एकूण तेरा जिल्हा परिषदेचे गट आहेत. इथे आंधळेंपासून आडसकरांपर्यंत आव्हान देत असले तरी या तीन तालुक्यात भाजपाच्या हाताला काही लागेल असे वाटत नाही. तिकडे आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात सोळा जागांसाठी माजी आ.भिमराव धोंडे, आ.सुरेश धस हे भाजपाकडून तर आ.बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादीकडून आपली ताकद दाखवतील. इथे मात्र आ.धसांचे आव्हान अन्य नेतृत्व पेलवीलच हे सांगणे कठीण आहे. दुसरीकडे गेवराई तालुक्यात दहा जागा असून इथे पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व अधिक असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. कधी अमरसिंह पंडितांनी स्वाभिमानीच्या नावाखाली जागा निवडून आणल्या. कधी बदामराव पंडितांनी अपक्ष म्हणून आपले अस्तित्व दाखवले त्यामुळे याठिकाणी पंडितांविरूध्द विद्यमान आ.लक्ष्मण पवार हे एकमेकांसमोर असतील परंतू इथे जो जिता वही सिकंदर राहत आला आहे. बीडमध्ये राज्याच्या राजकारणातील अस्थिरतेचे पडसाद चांगलेच उमटलेले आहेत. राजकारणातले थोरले घर म्हणून ज्या माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांकडे पाहिले जाते त्यांनी अद्यापही चुप्पी ठेवल्याने बीड तालुक्यातल्या नऊ जागांवर नेमके काय होणार? याबाबत अनिश्चितता आहे. इथे राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, शिवसंग्राम यासह अपक्षही तेवढ्याच ताकदीचे आहेत.
जयदत्त क्षीरसागरांचे पत्ते गुलदस्त्यात
गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात क्षीरसागरांच्या घरामध्ये भाऊबंदकी झाली. क्षीरसागरांना आपले संदिप क्षीरसागर यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले. मात्र राष्ट्रवादीकडून नगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना शिवसेनेपासून त्यांनी आजपावेत दूर ठेवले. आता नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका तोंडावर असताना आणि शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना अद्यापही जयदत्त क्षीरसागरांनी आपली भूमिका जाहिर केली नाही. आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले असले अन नगरपालिकेची निवडणूक हि आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याची चर्चा होत असली तरी यावर कुठलेच भाष्य नसल्याने जयदत्त क्षीरसागरांच्या पत्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बीड तालुक्यात मेटेंना महत्वच!
शिवसंग्रामचे सर्वासर्वे माजी आ.विनायक मेटे हे राज्याच्या राजकारणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये कायम चर्चेत राहतात. बीड तालुक्यामध्ये त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या निवडणूकीत मेटेंचे चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. यावर्षी ते आमदार नसले तरी भाजपाचे राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते अत्यंत जवळचे. त्यात मेटेंना सर्व काही देवू असे फडणवीसांनी दिलेले आश्वासन पाहता उद्याच्या निवडणूकीत बीड तालुक्यात मेटेंनाही तेवढेच महत्व असणार आहे.
पंकजांच्या पुनर्वसनावर जिल्हा परिषद निवडणूकीला महत्व
कधीकाळी अल्प मतात असलेले भाजप जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत स्व.गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात जादूच्या कांडीच्या माध्यमातून सत्तेत आल्याचे अनेकांनी पाहिले. मात्र गेल्यावेळेस असा प्रयोग करण्यास पंकजांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर राज्य पातळीवर पक्षांतर्गत विरोध आणि पंकजांना सातत्याने डावलणे यामुळे राज्याच्या नेतृत्वाचे आणि पंकजा समर्थकांचे अनेकवेळा वाद नाराजी दिसून आली. आता पंकजा मुंडेंना शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये संधी दिली गेली, त्यांचे पुनर्वसन केले गेले तरच भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमध्ये तरण्यासाठी हात पाय हालवील. या निवडणूकीला महत्व देईल.