आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडणार्या विरोधात
कायदा आणा-खा.इम्तियाज जलील यांची संसदेत मागणी
बीड(रिपोर्टर): लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये देशभरातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, बेरोजगार, शेती, व्यापार, औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य यासह लोकांच्या मुलभूत गरजांवर भाष्य करणं, अडीअडचणी लोकसभेत मांडत त्यावर तोडगा काढणं हे काम आहे. मात्र गेल्या काही दिवसात लोकसभेमधला सत्ताधारी आणि विरोधकांना गोंधळ पाहता पुढार्यांकडे नेतृत्वांकडे आणि पक्षांकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोण पार बदलून गेला. नेते किंवा त्यांचं राजकारण हे सर्वात गलिच्छ आहे असे संबोधण्यात येवू लागले. कधी जातीचं राजकारण, कधी धर्माचं राजकारण, कधी मंदिर, मस्जीद तर कधी एखाद्याला संपवण्याचा विषय एढ्यावरच भाष्य करत गोंधळ घालणार्या लोकसभेतील खासदारांना अंतर्मूख करणारा विषय औरंगाबादचे खा.इम्तियाज जलील यांनी मांडला. समाजातलं जळजळीत सत्य तेवढ्यात पोटतिडकीने मांडत वृद्ध मातापित्यांची व्यथा अन् वृद्धाश्रमाची सत्य कथा सांगितली. त्यांच्या या पोटतिडकीने मांडलेल्या जळजळीत सत्याने लोकसभाच नव्हे तर देशही अंतर्मूख झाला.
कौटुंबिक भांडणाच्या संदर्भात आपल्याकडे कायदा आहे हे नेहमीचंच प्रकरण आहे. मात्र आपण एका गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहोत. आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या बाबीचा विचार करायला हवा. जास्तकरून उच्च शिक्षित तरूण आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आपली जबाबदारी झटकवत आहेत अशांच्या विरोधात कायदा आणण्याची गरज असल्याचे एमआयएमचे खा.इम्तियाज जलील यांनी आज संसदेमध्ये मागणी केली आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये एमआयएमचे खा.इम्तियाज जलील यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. कौटुंबिक कलहाअंतर्गत आपल्याकडे कायदा आहे, हे नेहमीचंच आहे मात्र आपण एक सुसंस्कृत समाजामध्ये राहत आहोत अशा परिस्थितीत समाज एका गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली आहे ही चिंतेची बाब आहे, यावर कोणी बोलत नाही व आवाज सुद्धा कोणी उठवत नाहीत. आई-वडिल आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात, मुलाचं लग्न झाल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई-वडिलांना दुर सारण्याचा प्रयत्न करतो, मुलाची काही जबाबदारी नाही का? औरंगाबाद, पुणे मुंबईसारख्या शहरात गेल्या काही वर्षांपासून वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे. औरंगाबाद येथील एका वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त मी गेलो होतो या ठिकाणी एक सेवानिवृत्त न्यायाधिश वृद्धाश्रमात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत खूप वाईट वाटलं असे अनेक प्रकरणे समाजात पहावयास मिळत आहेत. उच्च शिक्षित असणारे तरुण आपल्या आई-वडिलांना सोडून विदेशामध्ये नोकर्या करतात. ते आपली जबाबदारी पुर्ण करत नाहीत. आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणार्याच्या विरोधात कारवाई करण्याचे विधेयक आणणे गरजेचे असल्याची मागणी खा.इम्तियाज जलील यांनी संसदेमध्ये केली आहे.