लोकांना बोलकं करण्यासाठी आम आदमीची सुराज्य मोहीम यात्रा
बीडचे प्रश्नही समजून घेणार -मोडक

बीड (रिपोर्टर): महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय सरकार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडणारा पक्ष राहिला नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने 1 मेपासून सुराज्य मोहीम यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही यात्रा साडेचार हजार किलोमीटर चालणार असून बीड जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न देखील आम्ही समजून घेणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राज्य संघटक अॅड. मनीष मोडक यांनी दिली.
आम आदमी पार्टीची सुराज्य मोहीम यात्रा आज बीडमध्ये आली असता राज्य संघटक मंत्री अॅड. मनीष मोडक, राज्य सचीव अभिजीत मोरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अशोक येडेसह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अॅड. मोडक म्हणाले की, राज्यातील जनतेचे प्रश्न समजून घेणारा कुठलाही पक्ष राहिलेला नाही. सर्वपक्षीय सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. जनतेचे अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न समजून घेण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सुराज्य यात्रा आयोजीत करण्यात आली आहे. या यात्रेची सुरुवात 1 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून झालेली आहे. छत्तीस जिल्ह्यात साडेचार हजार कि.मी. यात्रा चालणार असल्याची माहिती मोडक यांनी दिली असून ते पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातही अनेक समस्या आहेत. शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. शहरातले प्रश्न आम्ही जाणून घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.