नवी दिल्ली (वृत्तसेवा) शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर महाविकासआघाडी कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचं ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह राहणार की नाही हेही संकट निर्माण झालं. त्यामुळे ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. आता याबाबत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाविरोधातील ठाकरे गटाच्या या याचिकेवर सुनावणीचा महत्त्वाचा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी घेतला आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा यांच्याच खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.विशेष म्हणजे या याचिकेच्या सुनावणीबाबत मत नोंदवताना सरन्यायाधीश रमण्णा यांनी आम्हाला निर्णय द्यावाच लागेल, असं सूचक वक्तव्यही केलं आहे.