-
गणेश सावंत -9422742810
होय, हे त्रिवार सत्य आहे. एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा आणि चारदा नियतीने स्वत: विवस्त्र होत आपलं कुरुप देह बीड जिल्ह्याला दाखवला. त्या कुरुप देहात बीड जिल्ह्याच्या माणसाने सातत्याने आपले छत्र हरवले. देशाच्या पाठीवर कधीकाळी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला विचारात घेतल्याशिवाय दिल्ली तक्ताचे पानही हलत नव्हते, तसे काल-परवापर्यंत बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधार्यांचे पान हलत नव्हते अन् विरोधकांचेही पान हलत नव्हते. मात्र गेल्या दीड दशकाच्या कालखंडात प्रमोद महाजनांच्या हत्येपासून ते मुंडे-मेटेंच्या अकाली अपघाती निधनापर्यंत नियतीने तुमची-आमची क्रुर थट्टाच केली. काय त्या नियतीच्या मनात माहित नाही. परंतु आम्हाला एवढे कळते, नियतीने सातत्याने नागवीच होत असेल, गढ्यांनो तुम्हालाही आता नागवं व्हावं लागेल. या आजच्या जलदगतीच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल, जिल्ह्याचं वैभव पुन्हा महाजन-मुंडे-मेटेंसारखं सह्याद्रीच्या टोकावर न्यायचं असेल तर नव्या पोरांना राजकारणात नि:स्वार्थपणे उभं ठाकताना नागवं व्हावं लागेल. नंगे से खुदा डरता है, असं म्हणतात, तेही सत्यच! देव आधी देव व्हायचं असेल, महादेव व्हायचं असेल तर त्यालाही नागवच व्हावं लागतं. आता ती वेळ आली आहे, नियती प्रत्येक आठ वर्षाला बीड जिल्ह्याला रंडकं करतेय, छत्र हिरावून घेतेय, आधार काढून घेतेय, इ.स. 2006 साली
महाजनांची ती हत्या
स्मरली की, राग येण्यापेक्षा आत्मचिंतीत होत भाऊच भावाचा वैरी इथेच होऊ शकतो आणि त्या वैरभावाचा तोटा जसा देशाला होतो तसा जिल्ह्यालाही झाला. हे आम्ही सांगायची गरज नाही. परंतु मेटेंच्या अपघाती निधनाने पुन्हा एकदा त्या जखमांवरच्या खपल्या निघल्या. त्या वेदना आणि हरवलेल्या चेतना बोलू लागल्या. प्रमोद महाजन आणि बीड जिल्ह्याचं नातं जन्मभूमीचं आणि कर्मभूमीचंच. प्रमोद महाजन हे राज्याचे नेते नव्हते तर दिल्ली तक्तालाही काबीज करत अवघ्या देशाला आपल्या कवेत घेणारा हा बीड जिल्ह्याचा अर्जुन होता अन् हेच प्रमोद महाजन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण होता. मग तुम्हीच सांगा, महाजनांची झालेली हत्या त्यातून देशासह राज्याचे आणि बीड जिल्ह्याचे झालेले नुकसान हे नियतीवर राग काढणारे नव्हेत काय? जेव्हा जेव्हा बीड जिल्ह्याचं नेतृत्व उदयास येत जातं त्या नेतृत्वाचा प्रखर प्रकाश अखंड देशामध्ये पडायला सुरुवात होते तेव्हाच अंधाराचं साम्राज्य बीड जिल्ह्याच्या घराघरांमध्ये घेऊन येण्याचा हटवादीपणा नियती करते. प्रमोद महाजनांच्या बाबतीत तेच झालं. आता मागास बीड जिल्ह्याचं वैभवात रुपांतर होईल, सिंचनाच्या प्रश्नासह उद्योग धंदे उभे राहतील या अपेक्षेत असलेल्या जिल्ह्याच्या सर्वसामान्याला प्रमोद महाजनांची हत्या धायमोकलून रडायला लावणारी होती. त्या दु:खद घटनेला आणि बीड जिल्ह्याच्या कधी न भरून निघणार्या नेतृत्वतीत तोट्याला दुधाची तहाण ताकावर भागवण्याचे ठरवत जिल्हावासियांनी मुंडेंचं नेतृत्व स्वीकारलं. मुंडे हे एका पक्षाचे काम करत असले तरी बहुजनांचं सुख-दु:ख अनुभवणारे आणि उपेक्षितांच्या प्रश्नांना स्वत:च्या हृदयात जागा देणारे अनाथाचे नाथ गोपीनाथ मुंडे आपला उद्धार करतील, ते
दक्षणेवरचे मालक
नक्कीच नाहीत, त्यांचा पक्ष जरी आमच्या दक्षणेवर चालत असला आणि ते मालक होऊ पहात असले तरी त्या पक्षाच्या पाठीशी केवळ गोपीनाथ मुंडे हे आहेत. यांच्यामुळेच त्या पक्षाशी रहायचं. म्हणून बीड जिल्हाचंच नव्हे अवघा महाराष्ट्र आणि ओबीसींबरोबर बहुजन मुंडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. शेठजी भटजींचा पक्ष म्हणून गणल्या जाणार्या भाजपाला महाराष्ट्रात जागा दिली, ज्या पक्षाचे उभ्या महाराष्ट्रात पाच ते बारा टक्क्यांवर मते होती त्या पक्षाला ओबीसीची झालर लावत अक्षरश: इ.स. 1995 साली या मराठी मुलुखावर सर्वप्रथम भाजपाचा आणि शिवसेनेचा ध्वज फडकवला गेला. संकुचीत वृत्ती असलेल्या पक्षाची विचारधारा शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कधीच पसरली नसती, रुजली नसती केवळ गोपीनाथ मुंडे हे उपेक्षीतांचे, कष्टकर्यांचे, शेतकर्यांचे आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व करायचे म्हणून या संकुचीत वृत्तीला महाराष्ट्रात जोपासले गेले. त्या संकुचीत वृत्तीची वेली आज गगनावर गेली असली ती विषवेलीगत मानली जाते. इथेही जिल्हावासियांचे दुर्दैव. 2006 साली एक आघात सहन केला होता. पुरोगामी विचारांचा आणि देव करतो ते भल्यासाठीच करतो, असं म्हणत घडलेल्या कुठल्याही घात-पात-घटना, चांगल्या-वाईट सुचना स्वीकारणारा नेता प्रमोद महाजन यांना हृदयात ठेवून मुंडेंचं नेतृत्व सर्वांनी स्वीकारलं होतं. मुंडे दिल्ली तक्तावर गेले, पुन्हा तीच स्वप्नं जागे झाली, तेच सिंचनाचे प्रश्न सुटतील, उद्योगधंदे वाढतील, रेल्वे येईल, वाढत्या बेरोजगारीला आळा बसेल, असे वाटत असतानाच पुन्हा नियतीने आपले कुरुप देह जिल्हावासियांना दाखवण्याहेतू 3 जून इ.स. 2014 साली दिल्लीत गोपीनाथरावांचा अपघात घडवून आणला आणि गोपीनाथरावांना हिरावून घेतले. पुन्हा जिल्हावासी उघडा पडला. जिल्हावासियांच्या स्वप्नांची अक्षरश: राखरांगोळी झाली. लोकनेता, अनाथाचा नाथ असलेला बहुजनांचा कैवारी जेव्हा निद्रीस्त झाला तेव्हा अखंड महाराष्ट्राचा बहुजन हुंदके देत रडला. मुंडे-महाजनांच्या मृत्यूमधला कालखंड हा आठ वर्षांचा होता. मुंडेंचं जाणं त्यातून जिल्ह्याची झालेली हानी ही कधीही भरून निघणारी नाही. मुंडे विसरणे शक्य नाही. मात्र आजच्या युगात पुढे तर जावेच लागेल. मी असेन नसेन हे मुंडेंचेच शब्द त्यामुळे इथला बहुजन पुढे निघाला तोच
बहुजनाचा नायक
पुन्हा नियतीने हिरावून घेतला. मुंडेंच्या निधनानंतर आठ वर्षानेच म्हणजेच 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रामचे सर्वेसर्वा मराठ्यांसह बहुजनांचं नेतअत्व करणारे नेते विनायक मेटे हे अपघातात मृत्यूमुखी पडले. महाजन-मुंडें पाठोपाठ महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असलेला सर्व पक्षांमध्ये संबंध ठेवत जिरवाजिरवीच्या राजकारणात हाबूक ठोकणारा सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्याच्या दालनात बेधडक जाणारा नेता अपघातात पुन्हा जिवानीशी गेला. नियती जाणीवपुर्वक नागवी होत आपलं कुरुप देहासन जिल्हावासियांना दाखवते आणि खिदखिद हसतेय. महाजन-मुंडे आणि आता मेटे जाणे हे बीड जिल्ह्याच्या विकास आणि भविष्यासाठी सर्वात मोठे तोटे म्हणावे लागतील. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठलं राजकारण करतो, समाजकारणापेक्षा राजकारण करताना कोण कोणाची जिरवतो याची सर्वसामान्यांना काहीच गरज नसते, अथवा त्याचे देणेघेणे नसते. बीड जिल्ह्याचा एखादा नेतृत्व करणारा नेता हा बलशाली होत असेल, राज्याच्या पाठीवर, देशाच्या पाठीवर अधिराज्य गाजवत असेल, राज्य अथवा देश त्याला विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नसतील तर ते त्या जिल्ह्याचे वैभव असते. एक वेळेस नव्हे तर तीन-तीन वेळेस बीडच्या वैभवाची सर्रास लूट नियतीने केली. आता बस्स झालं. नियतीचा हा नागवा खेळ थांबवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या तरुणांनी थेट नियतीशी दोन हात करण्याहेतु नि:स्वार्थ राजकारण करताना आता
गड्या तूही नंगा हो
असं आम्ही नियतीचं गचुरा धरण्यासाठी स्पष्टपणे म्हणू. आम्ही उघड म्हणतो आणि सत्य बोलतो. ‘‘जो नंगा होऊ शकत नाही तो मोक्षाला जाऊच शकत नाही. नंग्याला खुदाही डरतो आणि राज्यकर्त्यांनाही खरे भय नंग्याचेच वाटते. या भारताला मुक्त केले, जे एक्या नंग्या फकिरानेच. देवामध्ये जो नंगा तोच महादेव ठरला. जो नंगा नाही त्याचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही. तेव्हा गड्यांनो तुम्ही नंगे व्हा.’’ म्हणजे चड्ड्या काढून उघडे होऊ नका, नंगे व्हा म्हणजे विचाराला विचारांनी उत्तर देण्यासाठी तो लहान आहे की मोठा आहे, तो गरीब आहे की श्रीमंत आहे हे पाहू नका. एखादे सत्य उजागर करायचे असेल तर समोर कोण आहे याचाही विचार करू नका. जर ती साक्षात नियती असेल तर तिलाही यापुढे नागवे होऊ देऊ नका. आपल्या वैचारिक सत्यशील, तत्वशील विचाराच्या पांघरुणाने तिच्या अंगावर ती सौंदर्यशील दिसेल असे कपडे टाकण्यासाठी तयार रहा. आता महाजन नाहीत, मुंडे नाहीत, मेटेही नाहीत महाराष्ट्रात तुमचा आवाज गड्यांनो आता तुम्हालाच व्हायचंय.