बीड (रिपोर्टर) तारखेला आलेल्या एकास चौघा जणांनी भरचौकात जाळून टाकण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
किशोर शामसुंदर अधापुरे यांच्या पत्नीने पोलीस अधिक्षक कार्यालयात त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. तारखेसाठी ते कार्यालयात गेले असता कृष्णा दत्तात्रय शहाणे, सोनाली किशोर अधापुरे (रा. दोघे मालेगाव खुर्द ता. गेवराई), मनिषा विजय डहाळे, विजय सोपान डहाळे (रा. सिडको महानगर 2, औरंगाबाद) यांनी संगनमत करून किशोर अधापुरे यांना शिवीगाळ करून तुला भरचौकात जाळून टाकू, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी किशोर अधापुरे यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा अदखलपात्र स्वरुपाचा असल्याने तक्रारदारास न्यायालयात दाद मागण्याची समज देण्यात आली होती. त्यानुसार तक्रार त्यांनी त्यांचे विधिज्ञ अॅड. विजय नागरगोजे यांच्या मार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध फौजदारी अर्ज दाखल केला होता. सदरील प्रकरणामध्ये न्यायालयाने तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बीड शहर ठाणे यांना दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक अंतरप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अमलदार तोंडे यांनी सखोल तपास करून साक्षीदाराचे जबाब नोंदवून पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड येथील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या महिला पोलीस यांचे देखील जबाब नोंदवून न्यायालयात अवहाल सादर केला. सदरील प्रकरणातील फिर्यादीने दिलेली तक्रार, फिर्यादीचा पडताळणी जबाब, तपासी अमलदार यांनी केलेला तपास व सादर केलेला अहवाल तसेच अर्जदाराचे विधिज्ञ अॅड. नागरगोजे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून तक्रारीत आरोपीविरुद्ध भा.दं.वि.चे कलम 506, 534 प्रमाणे खटला चालवण्या इतपत पुरावा आढळून आल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, बीड यांच्या न्यायालयाने कायद्याप्रमाणे खटला नोंदवण्याचा आदेश पारीत करून प्रकरण निकाली काढले. सदरील गुन्ह्यात सात वर्षापर्यंतचा कारावास, द्रव्यदंड किंवा अशा शिक्षेची तरतूद आहे. प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अॅड. विजय नागरगोजे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. किरण प्रकाश चांदणे यांनी सहकार्य केले.