माजलगाव (रिपोर्टर) महाराष्ट्रातील लाखो तरुणांना नोकर्या देणारा, महाराष्ट्राची समृद्धी वाढवणारा प्रकल्प राज्याबाहेर जातो. हा प्रकल्प आमच्यामुळे नाही तर मागच्या सरकारमुळे गेल्याचे सांगता, हे काय 15 जुलै 2022 चे पत्र दाखवत अजित पवारांनी सरकारला खडसावत स्वत:चे अपयश दुसर्यावर फोडून तोंड वर करून सांगता, खोक्याने जमलं म्हणजे सगळं जमत नसतं. आता तरुणांनी पेटून उठले पाहिजे, पुन्हा म्हणता, हा प्रकल्प जाऊ द्या, दुसरं आणतो, तुमच्या घरचा आहे का? असं संतप्त होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडसावत पिक विम्याचे पैसे दिले जात नाहीत, लोकांचे कामे होत नाहीत, नोकरी मागायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मुलगा गेला तर त्याच्यावर लाठीचार्ज करता, ही सत्तेची मस्ती आहे ती उतरवण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. सत्तेतले आमदारच जर पिस्तूल काढून गोळीबार करू लागले तर तो हा महाराष्ट्र कुठले दिशेने जातोय, संविधानाने फोडाफाडीचे आणि खोक्याचे राजकारण करायचं सागितलं नाही. लोकांचे कामं करण्याचे काम सरकारचं असतं, चांगले कामे हाती घ्या त्या निर्णयांना आम्हीही पाठिंबा देऊ, असे अजित पवार यांनी या वेळी म्हटले.
ते माजलगाव येथे आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा आणि स्व.सुंदरराव सोळंके यांच्या जयंतीदिनी आयोजीत कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित, राजेश्वर चव्हाण, धैर्यशील सोळंके, सय्यद सलीम, जयसिंह सोळंके, डॉ. शिवाजी राऊत, ईश्वर मुंडे, जयदत्त नरवडे, खलील पठाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, संधी मिळाली तर त्याचं सोनं करावं लागतं, सुंदरराव सोळंके यांनी बीड, माजलगाव आणि मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे कष्ट केले. त्या कष्टातून मराठवाड्याला आणि बीड जिल्ह्याला त्यांनी बरच काही दिलं. राष्ट्रवादी हा पक्ष शेतकरी, तरुण, सर्वसामान्यांना संधी देणारा पक्ष आहे. कसल्याही प्रकारे संकटे आले तर त्यांच्या पाठिशी हा पक्ष उभा राहतो. त्यामुळे तेवढ्यापुरतं काम करू नका, झोकून देऊन पक्षाचे काम करा, नुसते भाषणात सांगून आमदार-खासदार निवडून येत नसतात त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. बुथ कमिट्या केल्यात का, लोकांपर्यंत जाताय का? आम्ही सात-सात वेळा निवडून येतो, आपल्या पक्षात अनेक नेते अनेक वेळा निवडून येतात ते सातत्याने जनतेच्या सोबत असतात. जनसंपर्क वाढला पाहिजे, लोकांची कामे झाली पाहिजेत. असं म्हणत अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना लोकात जाण्याचे आदेश दिले. प्रकाशदादा चांगले काम करत आहेत, त्यांचा कारखाना मराठवाड्यातल्या नावाजलेल्या कारखान्यांपैकी एक आहे. आता संदीप क्षीरसागर, धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे यांनीही कारखाने चालू केले आहेत, ते चांगले चालवा, जिल्हा बँका, संस्था चांगल्या चालवल्या पाहिजेत, ते चांगल्या तरच शेतकर्यांना मदत होईल. संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करावं लागतं. आता अतिआव्हाने आहेत, अडचणी आहेत, त्यावर मात करण्यासाठी संघर्ष करा, आज महाराष्ट्रात जे काही चाललं आहे, ते संतापजनक आहे. आज नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीसांकडे नोकरी मागण्यासाठी एक बेरोजगार गेला, त्याच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आली. अरे काय आहे हे, तो नोकरी मागायला आला होता, असे म्हणत संतापलेल्या अजित पवारांनी सरकारवर ताशेरे ओढले. आज राज्यामध्ये विविध विभागात पाऊन लाख जागा भरू शकतो, परंतु या सरकारला त्याचं देणंघेणं नाही. वेदान्तासारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो आणि सरकार मात्र वर तोंड करून मागच्या सरकारमुळे गेल्याचे सांगतो. हे घ्या, 15 जुलै 2022 चे मुख्य सचिवांच्या कक्षात झालेल्या बैठकीचे पत्र काय सांगतं हे पत्र, खोक्याने जमतं म्हणजे सगळच जमत नसतं असं नाही. सरकारच्या या भूमिकेविरुद्ध आता तरुणांनी पेटून उठले पाहिजे, अन् मुख्यमंत्री म्हणतात, हा प्रकल्प जाऊ द्या, दुसरं आणतो, घरचं आहे का? इथे पिक विम्याचे पैसे दिले जात नाही, भर पावसात लोकांना आणि युवकांना आंदोलन करावे लागते, बेरोजगार नोकरी मागायला आला तर त्याच्यावर लाठीहल्ला होतो, ही सत्तेची मस्ती आहे, ती उतरवण्याची ताकत महाराष्ट्राच्या जनतेत आहे. आपलं सरकार घालवण्यामागं कोण होतं, कोण कपडे बदलून जात होतं हे समोर आलं आहे. केंद्रात आणि अनेक राज्यात तुमचं सरकार आहे. भारतीय लोकशाही ही लोकांसाठी आहे. भारतीय संविधान फोडाफोडीचं राजकारण करायला सांगत नाही, खोक्याचं राजकारण करायला सांगत नाही, असं म्हणत भाजपावर टीकास्त्र सोडत चांगले निर्णय घेतले तर आम्ही त्या निर्णयांना पाठिंबा देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं. स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळ आम्ही स्थापन करून त्यासाठी निधी दिला. मुंडे साहेबांनी भाजपा पक्ष बहुजनांपर्यंत नेण्याचं काम केलं, परंतु हा पक्ष शेटजी,भटजी पुरताच मर्यादीत होता. मुंडे साहेब असतील, डांगे असती, फरांदे असतील, खडसे असतील यांनी भाजपासाठी योगदान दिलेले आहे. आजचं भाजपाचं राजकारण कशा पद्धतीने चालतं हे सर्वांना माहित आहे. आम्ही घेतलेले निर्णय बदलले जातात, सरपंच सदस्यातून निवडला जायचा आता जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच का निवडत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. कामाची आडवाआडवी केली जाते, आम्ही मात्र कधी कुणाची कामे अडवली नाहीत. सर्वांना सढळ हाताने विकास कामासाठी निधी दिलेला आहे. महाराष्ट्र कधी कुणासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.