मुंबई (रिपोर्टर) काँग्रेस अध्यक्षपदासाठी येत्या महिन्याभरात निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या नाराजीमुळेच चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचे कळतेय. या सगळ्यात आता काँग्रेसकडून चव्हाणांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहे. नाना पटोले यांच्याकडून काढून प्रदेशाध्यक्ष पद चव्हाणांना मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. यानंतर भाजपा नेत्यांची सूचक विधाने यामुळे चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या.
काँग्रेसमधील हा गोंधळ निस्तारण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पावले उचलली आहेत. चव्हाणांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्यासमोर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले असले, तरी प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्याची मागणीही या नेत्यांनी केल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना देखील अध्यक्षपदावरून काढण्याची शक्यता आहे. सध्या तरी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे देखील अस्पष्ट आहे.