मुंबई (रिपोर्टर) धनुष्यबाण निवडणुक चिन्हाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा निर्णय निवडणुक आयोग लवकरच घेणार आहे. यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत.
23 सप्टेंबरला ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला वेळ वाढवून दिली आहे. 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर शिवसेनेकडून आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेची ही मागणी मान्य करत 7 ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपलं म्हणणं 7 ऑक्टोबरपर्यंत मांडावं लागणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्षामुळे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यापैकी कोणा एकाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागण्याची शक्यता आहे. तसेच खरी शिवसेना कोणाची, याबाबत कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आहे. त्यामुळे काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.