भागवत जाधव । गेवराई
पद गेलं की घरात काही बरं वाईट झाल्यासारखं काही लोक राहतात. परंतु शिवाजीराव पदाच्या मोहात अडकले नाहीत, ते आज वयाच्या 83 व्या वर्षीही आधूनिक शेतीचे प्रयोग करताना दिसून येतात. मी त्यांना विचारलं, तुमचा वेळ कसा जातो? त्यांनी सांगितलं, काळ्या आईशी इमान राखतो, शिवाजीरावांनी चाळीस-पन्नास वर्षे तुमच्यासाठी दिले, स्वच्छ चारित्र्य ठेवून त्यांनी काम केले. त्यांचे तीन मुलेही निर्व्यसनी आहेत, स्वच्छ चारित्र्याचे आहेत, आता त्यांना तुम्ही शक्ती द्या, मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. मला माहित आहे, तुम्ही एकदा ठरवलं की, ते निर्णायक असतं. याचा याआधीही अनेकदा मला अनुभव आलेला आहे. कम्युनिस्ट पक्षाने याठिकाणी सातार्याच्या नाना पाटलांना उमेदवारी दिली होती, त्यांना तुम्ही दिल्लीत पाठवलं. आता तुम्ही ठरवा आणि पंडित कुटुंबियांना शक्ती द्या, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी
शिवाजीराव पंडित यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.अंबादास दानवे, रोहयो मंत्री ना.संदिपानराव भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील, आ.राजेश टोपे, आ.धनंजय मुंडे, आ.प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ.दिलीपराव देशमुख, आ.संजय बनसोडे, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सतिष चव्हाण, आ.संदिप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ.विक्रम काळे, आ.सौ.नमिता मुंदडा, माजी आमदार राजन पाटील, विलासराव खरात, जयवंतराव जाधव यांच्यासह बीड जिल्ह्यातील संत-महंतांची विशेष उपस्थिती होती. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, 1980 ची निवडणूक मला आठवते, एखाद दुसरी जागा सोडली तर या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळेसचे सुंदरराव, गोविंदराव, बाबूराव, हाबाडा आठवतो का? एखाद दुसरा हात दिसतोय, अरे नाही. अनेकांची हात वरी आहे म्हणजे हाबाडा अनेकांना माहित आहे, असे म्हणत शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ही सगळी मंडळी महाराष्ट्रात राजकारणात मला मनापासून साथ देत होती. शिवाजीरावांनी मला वेळोवेळी मोलाची आणि महत्वाची साथ दिली. दुष्काळ म्हटलं की, पहिलं नाव बीड जिल्ह्याचं निघायचं, ते जेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी दुष्काळ असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना त्यांनी आधार दिला. जायकवाडीचे पाणी तालुक्याला मिळावे यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. याच नाथ सागराच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून गेवराई तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक लोकांना फायदा झाला. जयभवानी कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात त्यांनी सहकाराची क्रांती केली. शेतकर्यांना न्याय दिला. तालुका सुजलाम् सुफलाम् आणि सुशिक्षित बनवण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. पद गेलं की, घरात काही बरं वाईट झाल्यासारखं लोक रातहता. नेते लोकांना विसरतात, पण शिवाजीरावांनी राजकारण सोडून शेतीत नवे बदल घडवून आधुनिक प्रकारची शेती केली. हा शेतकर्यांसाठी आदर्श आहे, असं म्हणत शरद पवारांनी उपस्थित लोकांना उद्देशून म्हटले, तुम्ही लोक एखादी गोष्ट ठरवली की तुम्ही ती तडीस नेता, कम्युनिस्टांनी एकदा सातार्याच्या नाना पाटलांना लोकसभेसाठी बीड जिल्ह्यातून उभे केले, त्यावेळी त्यांनी कर्जमुक्तीचा नारा दिला होता. तुम्ही लोकांनी त्यांना लोकसभेत पाठवले. शिवाजीरावांचे तिन्ही मुले निर्व्यसनी आहेत, लोकांमध्ये राहणारे, लोकांची कामे करणारे आहेत. त्यांना संधी द्या, माझी त्यांना ताकद असेल, असे आवाहन करत शिवाजीराव पंडितांनी शुभेच्छा दिल्या.
मराठवाड्याला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व
म्हणजे शिवाजीराव दादा – अंबादास दानवे
मराठवाड्याच्या विकासात शिवाजीराव दादाचा मोठा वाटा आहे. पैठण येथील नाथ सागरातून वाहणार्या उजवा कालवा व्हावा यासाठी दादांनी सत्ताधार्यांचे उंबरठे झिजवले म्हणूनच आज मराठवाड्यातील शेतकर्यांना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे दादानी केलेले काम कायम समरणात असून दादाचे नेतृत्व हे आमच्या मराठवाड्यासाठी कायम प्रेरणादायी असेल असे उद्गार राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी काढले.
दादांचे नेतृत्व प्रेरणादायी -जयंत पाटील
राज्याच्या राजकारण दादांचा नेतूत्व म्हणजे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तालुक्याचे नेतृत्व करताना दादांनी संपूर्ण मराठवाड्याला न्याय मिळावा यासाठी कायम संघर्ष केला. सुंदरराव सोळंकेना बिनविरोध निवडून देत तालुक्यात विकास व्हावा यासाठी अतोनात प्रयत्न केले हा त्यांचा मोठेपणा राज्याने पहिला. आज दादानंतर अमरसिंह पंडित हे त्यांचा वारसा सक्षम पणे चालवत आहेत. मागील काळात विजयसिंह पंडितांना जरी पराभव पत्करावा लागला असला तरी ते मनाने न खचता दुसर्या दिवसापासून जनतेत मिसळले त्यामुळे येणार्या 2024 च्या निवडणुक त्यांचा विजयरथ कोणीच रोखणार नसल्याचे याठिकाणी दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील जनतेशी
नाळ जोडणारे दादा -टोपे
शिवाजीराव दादांचा आपलेपणा म्हणजे लोकांमध्ये कसे राहायचे, ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडली. शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील विविध व्यासपीठावर त्यांनी दबदबा निर्माण केला. तालुक्यातील विविध भागात प्रेमाचा धागा विनला. वेगळा नावलौकिक प्राप्त करून बांधिलकी जोपासून काम केले. त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे प्रतिपादन माजी मंत्री
आमदार राजेश टोपे यांनी केले.
मला पंडित कुटुंबियांचं प्रेम
मिळालं -रावसाहेब दानवे
दादांच्या आशीर्वादाने मला या तालुक्यात नेतृत्व करण्याची संधी लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या मतदार संघात तलागाळात पोहचलो. आज येथे दादाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित राहतात यावरून दादाच्या कार्याचे महत्व विशद होत आहे. दादांची राजकीय कारकिर्द ही आमच्या वयापेक्षा फार मोठी आहे. वयाच्या 25 व्या वर्षी राजकारणात येऊन तालुक्यात विकासाचे जाळे निर्माण केले. कायम जनतेवर आणि शेतीवर प्रेम करणारा नेता म्हणजे शिवाजीराव दादा. मी या मतदार संघात लोकसभेला उभा असताना मला या पंडित कुटुंबाचे मिळलेले प्रेम मी कधीच विसरणार नाही. आज मी इतर पक्षात असताना दादांनी मला पुन्हा खासदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. दादांच्या सोहळ्याला पवार साहेब येत असून आपल्याला जायला पाहिजे म्हणून मी गुजरात हुन उपस्थित राहीलो.
शरद पवार-दानवे एकाच गाडीत आले
गेवराईला येण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज सकाळी औरंगाबाद येथे आले होते. याठिकाणी ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. याच कार्यक्रमाला राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेसुद्धा गेवराईला येत होते. ते औरंगाबादला आल्यानंतर शरद पवार एका हॉटेलमध्ये असल्याचे त्यांना माहित झाल्यानंतर दानवे स्वत: त्या हॉटेलमध्ये गेले आणि दोघेही एकाच गाडीमध्ये गेवराई येथे दाखल झाले. पवार आणि दानवे एकाच गाडीमध्ये आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
बेरोजगारांना
नोकर्या देणारं व्यक्तिमत्व -संदीपान भुमरे
दादांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आसली तरी आज 85 वर्ष उलटूनही ते समाजकारणात सक्रिय असल्याचे दिसत असून मंत्रीपदाच्या काळात दादांनी केलेले काम आमच्या मराठवाड्यासाठी कायम समरणात राहील. दादांनी तालुक्यात शिक्षणाचे जाळे उभारून अनेकांना नोकर्या दिल्या. राज्याच्या राजकारणात त्यांचे विशेष महत्व होते म्हणूनच आज वयाच्या 80 व्या वर्षीही शरद पवार साहेब त्यांच्यासाठी याठिकाणी उपस्थित आहेत. गेवराई तालुक्यातील एकमेव असलेला जय भवानी सहकारी कारखान्याची उभारणी करून तालुक्यातील शेतकर्यांना न्याय दिला असे राज्याचे रोहयोमंत्री संदीप भुमरे यांनी म्हटले आहे.
दादांचे अपूर्ण असलेले स्वप्न विजयसिंहांना
आमदार करून पूर्ण करणार – धनंजय मुंडे
शिवाजीराव दादांचे कार्य किती मोठे आहे हे मी सांगण्यापेक्षा वयाच्या 85 व्या वर्षी आदरणीय शरद पवार साहेब उपस्थित रहात आहेत यावरूनच आपण समजून घेण्याची गरज आहे. मी फार लहान आहे दादाबद्दल बोलवं एवढा मी मोठा नसून त्यांच्या तीन मुलांप्रमाणे मी चौथा मुलगाच असून पंडित कुटुंब आणि आमचे ऋणानुबंध सर्व राज्याला परिचित आहे. दादांच्या काळात दादांनी जर कोणाच्या विरोधात टोपी काढली तर कोणाचं काही खरं नव्हतं. त्यांचे काम आमच्या सारख्या नवख्या नेत्यांना आजही प्रेरणादायी आहे. येणार्या काळात दादांचे एक अपूर्ण राहिलेले स्वप्न विजयसिहांना आमदार करून पूर्ण करू याच शुभेच्छा देऊन दादांचे अभिष्टचिंतन करतो असे सांगितले.
शिवाजी दादांचा गोडवा मी अनुभवला -श्रीनिवास पाटील
शरदरावांच्या उपस्थितीत शारदेचा पती शिव सन्मानित होतोय यासाठी ‘श्रीनिवास’ ला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य असून त्यांचा परिवार कायम अमर राहील असे सांगत श्रीनिवास पाटील यांनी गोड शब्द रुपी शुभेच्छा दिल्या. मी बीडला कलेक्टर असताना शिवाजीराव दादांचा गोडवा मी अनुभवला आहे. कोजागिरीच्या मुहूर्तावर दूध बारामतीचे साखर जय भवानीची या माध्यमातून आजच्या या सोहळ्याला आलेला गोडवा पंडित कुटुंबासाठी कायम रहावा हिच सदिच्छा असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.