माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे
यांच्याकडे तात्पुरता पदभार
बीड (रिपोर्टर) राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले निरंतर शिक्षणाधिकारी हे पद संपुष्टात आणून त्यांच्या जागी योजना शिक्षणाधिकारी या नवीन पदाची निर्मिती केली असून याचा पदभार माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
शिक्षण विभागामध्ये अल्पसंख्याक शिष्यवृत्ती विभाग, मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती विभाग, शिक्षण विभागाचे अनेक प्रस्ताव ऑनलाईन करणे, ही कामे सातत्याने मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील शिक्षकांना करावी लागत असत. शिकवणे दूर आणि याच कामात मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा वेळ जात असे. यामुळे शिक्षणाचा मूळ हेतू असलेला अध्यापन करणे हे मागे पडत असत. अनेक ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांना अणि शिक्षकांना या कामासाठी त्यांचा वेळ खर्च करावा लागत असे. काही वेळेस संबंधित वेबसाईट चालत नाहीत, तर ज्या ठिकाणी हे काम करायचे त्या ठिकाणी खूप मोठी वेटींग असल्यामुळे एकाच कामाला दोन-दोन तीन -तीन दिवस अध्यापन करणे होत नव्हते. त्यामुळे शिक्षण विभागाने निरंतर शिक्षणाधिकारी हे पद संपुष्टात आणून त्याऐवजी योजना शिक्षणाधिकारी हे पद तयार केले असून निरंतर विभागातील कर्मचारी वर्ग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील या योजनेतील काम मागणारे काही कर्मचारी या नवीन योजनेत समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आता शिक्षकांना अध्यापन करणे सोयीचे होईल.