नवरा अपंग, घरात कर्ती महिलाच, पावसाने कापसाच्या वाती केल्या, नैराश्येतून महिलेने टोकाचे पाऊल उचलले
गेवराई (रिपोर्टर) परतीच्या पावसाने हाहाकार उडवून सोडला आहे. शेतातले उभे पीक पाण्यात गेले आहे. सोयाबीनची माती तर कापसाच्या वाती झाल्या आहेत. अशा भयावह स्थितीत जिल्ह्यातला शेतकरी हतबल होत नैराश्यात आला असून घरात कर्ती असलेल्या शेतकरी महिलेने काल दिवसभर कापूस वेचला. मात्र या दरम्यान दोन ते तीन वेळा पाऊस आल्याने वेचलेला कापूसही भिजला. त्या नैराश्येतून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गेवराई तालुक्यातील नंदपूर कांबी येथे घडली.
याबाबत अधिक असे की, गेवराई तालुक्यातील नंदपूर कांबी येथील शेतकरी महिला सविता बळीराम मुळे (वय 42 वर्षे) या महिलेचा पती अपंग आहे. दोन मुलांसह सविता याच घर चालवतात. शेती करतात. मात्र गेल्या आठवडा-भरापासून जिल्ह्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात असलेल्या कापसाची वेचणी काल सविता या करत होत्या. दोन ते तीन वेळा पाऊस आला. त्या दरम्यान शेतातला कापूस तर भिजलाच, वेचलेला कापूसही भिजला. आता वर्ष कसं घालवायचं या चिंतेत आणि नैराश्येतून सविता मुळे या शेतकरी महिलेने आत्महत्या केली. या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी जावून पोलिसांनी पंचनामा केला.