नित्रूड (रिपोर्टर) परतीच्या पावसाने मराठवाड्यात हाहाकार निर्माण केला. कापूस, सोयाबीन, बाजरी यासह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एवढं मोठं नुकसान होऊनही राज्य सरकार झोपेतून जागे व्हायला तयार नाही. शासनाने आता पंचनामे न करता थेट अनुदान घोषीत करून दिवाळीपुर्वी 25 टक्के विमा अग्रीम जमा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नित्रूड येथे शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शेतकर्यांचा सहभाग होता. शासन व विमा कंपनीच्या निषेधार्थ शेतकर्यांनी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. या घोषणांनी सगळा परिसर दणाणून गेला होता.
चार दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये धुव्वाधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड झालेली आहे. या दोन्ही पिकांवरच शेतकर्यांची मदार होती मात्र अतिरिक्त पावसामुळे या दोन्ही पिकांची अक्षरश: माती झाली. शासनाने याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही. राज्य सरकारने अनुदान घोषीत करावे, पंचनाम्याचे नाटक करू नये. त्याचबरोबर विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम दिवाळीपुर्वी जमा करावा, या प्रमुख मागणीसाठी आज किसान सभेच्या वतीने माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासन व विमा कंपनीच्या विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. या वेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, नित्रूडचे सरपंच दत्ता डाके, सुभाष डाके, अशोक डाके, जगदीश फरताडे यांच्यासह शेकडो शेतकर्यांनी उपस्थिती होती.