गेवराई (रिपोर्टर) बसने प्रवास करणार्या एका महिलेने आपले सोन्याचे दागिणे पर्समध्ये ठेवले होते. यावेळी तिच्याजवळ बसणार्या दोन अनोळखी महिलांनी तिला नकळत पर्समधून तब्बल दहा तोळ्याच्या दागिण्यासह रोख आठ हजार रूपये काढून घेतले. हि घटना 21 ऑक्टोबर रोजी बीड ते गेवराई बस प्रवास दरम्यान घडली. घटना घडून दहा दिवस लोटले तरी अद्यापही तपास लागत नसल्याने फिर्यादी महिला पोलिस ठाण्यात चकरा मारत आहे.
मनिषा धनंजय देशपांडे (वय 48, रा.पवारवाडी ता.चाळीसगाव जि.जळगाव) या आपल्या बहिणीच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी जामखेडला गेल्या होत्या. त्यानंतर दि.21 ऑक्टोबर 2022 रोजी त्या आपल्या पतीसह परत गावी जात असताना सकाळी 9.45 वा. सोलापूर-धुळे बस क्र.एम.एच.13 सी.यु.7837 ने जात असताना 12.30 च्या दरम्यान ही बस बीड बसस्थानकात आली. यावेळी दोन अनोळखी महिलासह सोबत एक लहान मुलगा बसमध्ये येवून त्यांच्या सीटसमोर पायाजवळ खाली बसल्या. त्यानंतर ही बस गेवराई बसस्थानकात पोहोचल्यानंतर त्या दोन्ही महिला व मुलगा तेथे उतरल्या. गर्दी कमी झाल्यानंतर मनिषा देशपांडे यांनी आपल्या पर्सकडे पाहिले असता पर्सची चैन उघडी दिसली. त्यातील सोन्याचे दागिणे व रोख आठ हजार रूपये गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पर्समध्ये पाच तोळ्याचे मनीमंगळसुत्र, साडे अकरा ग्रॅमचे नॅकलेस, तीन तोळ्याचे बांगड्या, पाच ग्रॅमचे कानातले, पाच ग्रॅमचे कानातील वेल, मोरणी, एक अंगठी आणि रोख आठ हजार असा एकूण मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी त्यांनी दि.21 रोजी गेवराई पोलिसात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात अला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र घटनेला दहा दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीचा शोध लागला नाही. त्यामुळे गेवराई पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.