परळी (रिपोर्टर) परळी शहर आणि तालुक्यासाठी हातभट्टी दारू, गांजा, गुटखा, जुगार, बिंगो आणि देहविक्री हे काही जुने नाही, मात्र कोरोना काळात हा अवैध धंदा मंदावला होता आता हा धंदा पोलीस प्रशासनाच्याच आश्रयाखाली शहरात जोरात फोफावत चालला असून यावर वेळीच आवर घातला नाही तर शहरातील तरुण पिढी हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही असे तरुणांचा पालकाचे आणि शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
हाताने बनवलेली दारू म्हणजेच हातभट्टी दारू ट्रकच्या ट्यूब द्वारे बाईक अथवा ऑटो मध्ये ग्रामीण भागातून शहरात आणली जाते आणि ती मोठ्या प्रमाणात शहरातील फुले नगर, वडसावित्री नगर, गरुड चौक, सिद्धार्थ नगर, स्वाभिमान नगर या भागात खूप जास्तीचे प्रमाणात विकली जाते, पाहायला गेले तर ही दारू 10/15/20 रू या दराने ग्लास द्वारे विकली जाते ही दारू पिण्यास शहरातील बिगारी कामगार आणि अल्पवयीन मुले आघाडीवर असून त्या खालोखाल युवकांचा देखील नंबर येतो, कमी पैशामध्ये जास्त नशा या मार्फत चढत असल्याने यावर तळीरामांचा जास्त जोर असून यामुळे शहरातील असंख्य कुटुंब उघड्यावर पडले आहेत. विशेष म्हणजे स्वाभिमान नगर भागातील एका दारू विक्रेत्यांवर एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असताना, याच भागात दुसरे हातभट्टी विकणारे व्यावसायिक मात्र अजूनही सर्रासपणे दारू विक्री करत प्रशासनाची आब्रू वेशीवर टांगत आहेत.
शहरातील तलाब कट्टा, बरकत नगर, आझाद चौक या भागात गांजाची पुढी 50/100/200 या दराने विक्री केली जाते, हा गांजा ओढण्याचा आहारी शहरातील नवयुवक मोठ्या प्रमाणात जात असून चिलीम द्वारे गांजा ओढत युवक आपली तलफ भागवताना शहरातील बर्याच ठिकाणी रात्री आढळून येतात. शहरातील आझाद चौक भागातच लेडीज हॉटेलच्या बाजूला या दारू आणि गांजाची विक्री जास्त प्रमाणात होत असून यामुळे कॉलेजला ये जा करण्यार्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान अवैध धंद्यांना रोख लावण्यास पोलिस प्रशासन अपयशी ठरले असून या धंद्यांना पोलिसांचाच आशिर्वाद आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.