फुले पिंपळगावात शेतकरी संघर्ष समितीची ऊस परिेषद
बीड (रिपोर्टर) राज्य सरकारने कापसाला हमी भाव दहा हजार रुपये व उसाला तीन हजार रुपये द्यावा, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी आज फुलेपिंपळगाव येथे ऊस परिषदेत केली. या परिषदेला तालुक्यातील अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती. परिषदेपुर्वी गावातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे, शेती आज परवडत नाही, त्यासाठी शेतकर्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव दिला पाहिजे, बीड जिल्ह्यातील कारखानदारांनी उसाचा भाव जाहीर करावा, अशी मागणी माजलगाव तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील ऊस परिषदेतून भाई गंगाभीषण थावरे यांनी केली. एफआरपीनुसार उसाला 3 हजार रुपये भाव दिला पाहिजे, पण कारखानदार तितका भाव देत नाहीत, काही कारखानदार काटा मारतात. काटा मारणार्या कारखानदारांविरोधात साखर आयुक्त कार्यालय कुठलीही कारवाई करत नाहीत, हे कार्यालय शेतकर्यांसाठी ठोस भूमिका घेत नसेल तर कार्यालयच बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. सोयाबीनला 7 व कापसाला 10 हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, असे थावरे यांनी म्हटले असून या ऊस परिषदेला फुलेपिंपळगावसह इतर गावातील शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.