मुंबई (रिपोर्टर) ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटामध्येच आहेत. आज संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी बोलताना एकनाथ शिंदे आणि समर्थक यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचचं नाहीये. पण राज्यात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. जे नेते म्हणतात हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायमच असतो हे लक्षात घ्या, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान संजय राऊत यांनी थेट शिंदे गट फुटणार असल्याची भविष्यवाणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज अमोल कीर्तिकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचं भाकीत केलं. यावेळी बोलताना राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांच कौतुक केलं आहे. अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबत आहे. ठिक आहे, गजाभाऊंनी एक निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयासोबत अमोल नाहीत. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.