बीड (रिपोर्टर) भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधानदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बीड येथेही सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आज सकाळी 9 वाजता संविधान हातात घेत रथामध्ये ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून आज सकाळी संविधान रथ पदयात्रा सामाजिक न्याय भवनापर्यंत काढण्यात आली. या रथयात्रेत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जात पडताळणीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी जगदाडे यांच्यासह सहायक आयुक्त सामाजिक न्याय विभाग रविंद्र शिंदे हे सहभागी होते.
26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संविधान रथामध्ये सन्मानपुर्वक ठेवत उपस्थितांच्या हातात संविधानाची प्रत घेत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही पदयात्रा सामाजिक न्यायभवन या ठिकाणी आली. आजच्या परिस्थितीमध्ये या संविधानाचे महत्व या विषयावर सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहामध्ये व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष घुगे, समाजकल्याण निरीक्षक नखाते, चव्हाण, प्रा. रोडे, संदीप उपरे सह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.