बीड (रिपोर्टर) वर्षानुवर्षे ताब्यात असलेली गायरान जमीन नावावर होत नसल्याने आणि शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुलाचे हप्ते देण्यास नकार मिळत असल्याने वासनवाडी येथील कविता आप्पाराव पवार या आपल्या कुटुंबियासह जिल्हाधिकारी कार्यालया-समोर उपोषणाला बसल्या आहेत.
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वासनवाडी (ता. जि. बीड) येथील गट क्र. 163 व 166 मधील गायरान जमीन कसून माझी व माझ्या कुटुंबियाची उपजिविका भागवत आहे. तसेच शासनामार्फत शबरी आवास योजनेतून मला घरकुल मंजूर झालेले आहे. मी या घरकुलाचे भायाभरणीचे काम पुर्ण केले आहे. मात्र या घरकुलाचा दुसरा हप्ता काढण्यास ग्रामसेवक व सरपंच नकार देत आहेत. याबाबत अनेकवेळा तहसीलदार, जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे मात्र ते कसल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. मी राहत असलेल्या सदर गायरान जमीनीतून हे लोक आम्हाला हाकलून देत आहेत. घरकुल बांधण्यासाठी आम्ही विटा, सिमेंट, खडी तेथे आणून टाकले होते मात्र ते कोणीतरी परस्पर चोरून नेले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणीही आमची दखल घेत नाहीत. अशा मागणीचे निवेदन कविता आप्पाराव पवार यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत विभागीय आयुक्तांना दिले आहे.