बीड (रिपोर्टर) ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांची आणि प्रशासनाची उडालेली धांदल समोर आल्यानंतरही बीड जिल्हा निवडणूक विभाग स्वत:त सुधारणा करून घेण्यात तयार नसल्याचे पून्हा एकदा समोर येत असून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना आपला खर्च दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असून संबंधीत साईट बंद असल्याचे दिसून येते. ऑफलाईन निवडणूक खर्च घेण्यास जिल्हा प्रशासन तयार नसल्याच्या तक्रारी निवडणूक लढवलेल्या उमेदवारांकडून केल्या जात असून गेल्या पंचवार्षिकमध्ये उमेदवारांनी आपला खर्च दाखल न केल्यामुळे एक हजारापेक्षा जास्त उमेदवारांना निवडणूक लढवता आली नव्हती. त्यामुळे यावेळी उमेदवारांनी खर्च दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत परंतू ऑनलाईन खर्च दाखल करता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
गेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी खर्च दाखल केला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त उमेदवारांना निवडणूक लढवण्याबाबत अपात्र ठरवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. यामध्ये विजयी उमेदवार आणि पराजीत झालेले उमेदवार यांना निवडणूक दरम्यान केलेला खर्च निवडणूक विभागाला दाखल करावयाचा आहे. निवडणूक विभागाने सदरचा खर्च हा ऑनलाईन दाखल करण्याबाबत सूचीत केले आहे. मात्र ज्या पोर्टल साईटवर हा खर्च दाखल करावयाचा आहे ती साईट सातत्याने बंद असते. निवडणूक होवून आज पाच दिवस उलटून गेले मात्र बीड जिल्ह्यातल्या उमेदवारांना आपला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल करता आलेला नाही. ज्या पध्दतीने उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारण्यात आले. त्या पध्दतीने उमेदवार संबंधीत यंत्रणेकडे ऑफलाईन खर्च दाखल करण्यासाठी गेले मात्र बीडच्या निवडणूक यंत्रणेने संबंधीत उमेदवारांचे खर्च ऑफलाईन स्विकारण्यास नकार दिला. एकीकडे ऑनलाईन खर्च दाखल होत नाही. दुसरीकडे ऑफलाईन खर्च स्विकारण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे भविष्यात आपण निवडणूक लढवण्यास अपात्र तर होणार नाही ना? अशी भिती उमेदवारांमध्ये व्यक्त होत असून निवडणूकीमध्ये झालेला खर्च जिल्हा प्रशासनाने ऑफलाईन स्विकारावा अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
ठाण्यात ऑफलाईन खर्च स्विकारला जातो,बीडमध्ये का नाही?
राज्य निवडणूक आयोगाने 10/11/2022 रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे आदेशीत करून ऑनलाईन खर्च सादर करण्याबाबत दिले गेलेली सुविधा ही ऐच्छीक आहे. या प्रक्रियेत अडचणी येत असल्यास उपरोक्त उमेदवारांनी खर्चाचा हिशोब ऑफलाईन पध्दतीने सादर केल्यास संबंधीत तहसिलदारांनी तो स्विकारावा हे ठाणे जिल्ह्यात होवू शकते. मग बीड जिल्ह्यात उमेदवारांचा खर्च ऑफलाईन का स्विकारला जात नाही? असा सवाल विचारला जात आहे.