विधिमंडळात कंपनीच्या विरोधात आवाज उठवावा
बीड (रिपोर्टर) बजाज अलायन्स विमा कंपनीकडून बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना नाहकपणे छळण्याचे काम केले जात आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या. अनेक शेतकर्यांना तक्रारींचे मॅसेज सक्सेसफुल आले, आता कंपनीकडून अनेक शेतकर्यांच्या तक्रारी रिजेक्ट करण्यात आल्या आहेत. कंपनीचा हा दुटप्पीपणा पाहता शेतकर्यात संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. या कंपनीच्या विरोधात विधिमंडळात आवाज उठवला पाहिजे, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जाऊ लागली आहे.
बीड जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. या पावसाने खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं. एवढं मोठं नुकसान होऊनही बजाज अलायन्स ही कंपनी शेतकर्यांना विमा देण्यास टाळाटाळ करू लागली. काही शेतकर्यांना तुटपुंजा विमा आला तर काहींना याचा लाभच मिळाला नाही तर ज्या शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या त्या शेतकर्यांना तक्रार सक्सेसफुल झाल्याचे मॅसेज आले. आता पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीकडून अनेक शेतकर्यांच्या तक्रारी रिजेक्ट करण्यात आल्या आहेत. असाच प्रकार खापर पांगरी येथील संतोष शेंडगे यांच्या बाबतीत झाला. त्यांनी याबाबत कंपनीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. आमच्या हातात काही नाही ते होतय ते सगळं केद्र सरकारडून होत असल्याचे थातूरमातूर उत्तर शेतकरी शेंडगे यांना कंपनीकडून देण्यात आला आहे. अशा पद्धतीने कंपनीकडून शेतकर्यांना त्रास दिला जात असेल तर याबाबत विधिमंडळात बीडच्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा व ज्या शेतकर्यांना तक्रार करूनही विमा मिळाला नाही त्यांना विम्याचा लाभ मिळायला हवा.