पिडिता गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू, संशयित नराधम सीसीटीव्हीत कैद, आरोपीचा शोध सुरू
गेवराई (रिपोर्टर) शहरातील बसस्थानक परिसरामध्ये 70 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत असून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात नराधमाने सदरच्या वृद्धेस बेदम मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले. पिडित वृद्धेला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून नराधम एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अद्याप पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसला तरी घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक असे की, गेवराई बसस्थानक परिसरामध्ये एक महिला गेल्या अनेक वर्षांपासून फळ विकून आपली उपजीविका भागविते. तिच्या कुटुंबातले अन्य लोक कामानिमित्त औरंगाबाद येथे राहतात. तर ज्या ठिकाणी ती फळविक्री करते त्याच भागामध्ये सदरची पिडिता राहते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका नराधमाने या वयोवृद्ध महिलेला लक्ष्य केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या वेळी नराधमाने सदरील पिडितेस बेदम मारहाणही केली. महिलेवर बलात्कार केल्यानंतर हा नराधम घटनास्थळाहून पसार झाला असता सदरचा नराधम एका दुकानदाराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गेवराई बसस्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही आहेत परंतु ते बंद असल्याचे सांगण्यात येते. येथील नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे सदरचे सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. पिडितेला नराधमाने बेदम मारहाण केली, तिच्यावर अत्याचार केले, यात पिडिता जखमी असून तिला उपचारार्थ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नसला तरी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळासह पिडिता दाखल असलेल्या रुग्णालयामध्ये पोहचली आहे. दुकानदाराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला संशयित कोण? त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
गुन्हेगारी रोखण्यात रविंद्र पेरगुलवार अपयशी
शहरात कायदा सुव्यवस्थेचे तिनतेरा
गेवराई पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार हे शहरासह ग्रामीण भागातले गुन्हे रोखण्यामध्ये अपयशी ठरत चालले आहेत. शहरात गस्त नसणे, गुन्हेगारांवर वचक नसणे यामुळे अशा गंभीर घटनांना अंजाम देण्यास गुन्हेगारी प्रवृत्ती समोर येते. अशा संतप्त प्रतिक्रिया देत शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीचा निषेध केला आहे.