बीड (रिपोर्टर) शहरातील इस्लामपुरा भागात असलेल्या शहेंशाहवली दर्गा परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. शाळकरी मुलांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये-जा करावी लागते. स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिका या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष करत आहे. स्वच्छता करून घेण्याचं काम या वार्डातील आजी-माजी नगरसेवकांचे आहे. मात्र नगरसेवक नुसतीच नौटंकी करत असतात. विद्यमान मुख्याधिकार्यांनी तरी या भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
इस्लामपुरा भागामधून एक एमआयएमचा आणि भारतभूषण क्षीरसागर गटाचा असे दोघे नगरसेवक निवडून आले होते. येथील नागरिकांनी या दोघांवर विश्वास दाखवून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडले होते. मात्र या भागातील प्रश्न सोडविण्यात दोघेही अपयशी ठरले. शहेंशाहवली दर्गा परिसरात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. शाळकरी मुलांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवास करावा लागतो. नालीचे पाणी रस्त्याने वाहू लागले. नगरपालिका प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेकडे आजी-माजी किंवा भावींनी तरी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दरम्यान, वार्डाची परिस्थिती पाहता इस्लामपुरा भागातील नागरिकांत गतवेळी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्याचबरोबर नगरपालिके विरोधातही रोष व्यक्त होत आहे.