बीड (रिपोर्टर) बीडच्या शिक्षण विभागाने शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू केल्या केल्या प्रथम संवर्गातून तब्बल 336 शिक्षकांनी अपंग आणि आजार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये भरण्यात आले. याबाबत संशय आला असता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने वैद्यकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत या शिक्षकांची तपासणी केली असता 235 शिक्षकांचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे उघड झाले असून बोगसगिरी करू पाहणार्या या 235 शिक्षकांना मेडिकल बोर्डाकडे फेरतपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे यातील काही शिक्षकांच्या नोकरीवरही गदा येणार असल्याने बोगसगिरी करणार्या शिक्षकांत खळबळ उडाली आहे. बीडमध्ये तपासणी करण्यात आलेले शंभर शिक्षक मात्र शंभर टक्के सोनं निघाले.
ग्रामविका विभागामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक विभागाची बदली प्रक्रिया अॅनलाईन राबविण्यात येते. या प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरताना जे शिक्षक खरोखरच अपंग आणि मोठ्या आजाराने ग्रासलेले असतील अशा शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून सुट मिळते. बीड जिल्ह्यातील 336 शिक्षकांनी ऑनलाईन बदली प्रक्रियेत अर्ज भरताना कोणी अस्थिव्यंग, कोणी कर्णबधीर, कोणी मुके असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र भरले होते. तर काहींनी आपल्याला मोठा दुर्धर आजार असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद काळे यांना शंका आल्याने त्यांनी या सर्वच शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी वैद्यकीय अधिकार्याच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय अंतर्गत 7 वैद्यकीय अधिकार्यांची तज्ञ समिती नेमली. या समितीच्या उपस्थितीमध्ये 336 शिक्षकांना बोलावून ही तपासणी करण्यात आली. 336 पैकी 333 शिक्षक या समितीपुढे हजर झाले. त्यातील शंभर शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आजार खरे असल्याचे या वैद्यकीय अधिकार्यांना आढळून आले. बाकी 236 पैकी एका शिक्षकाची पुणे येथे बदली झाल्याने 235 शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आजार संशयास्पद आढळून आल्याने अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपंग बोर्डाकडे या सर्व शिक्षकांचे प्रमाणपत्र आणि तपासणी होणार आहे. त्यामध्ये पुन्हा जे खरोखरच बोगस निघतील त्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याने या शिक्षकात खळबळ उडाली आहे.