मुंबई (रिपोर्टर)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारला 6 महिने झालेत. या 6 महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेव्हापासून सरकारच्या दुसर्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली होती. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
संजय शिरसाट शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले – ’मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगितले. या अडचणी 15 तारखेपर्यंत दूर होतील. त्यानंतर 20-22 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज आहे,’ असे ते म्हणाले. ’सरकारमधील अनेक राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री भरायची आहेत. काही गोष्टींमुळे विस्तार रखडलाय. विस्तार होणार नाही असे नाही, तो करावाच लागणार आहे,’ असेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेना संपूर्ण रिकामी होणार
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. ते म्हणाले की, ’येत्या काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे रिकामी होईल. शिवसेनेचे उर्वरित आमदार पुढील 8-10 दिवसांत शिंदे गटात सहभागी होतील.
शिवसेनेत सकाळी सुरू असलेल्या भोंग्यामुळे ही वेळ येईल. विशेषतः भविष्यात निवडणूक लढवायची किंवा नाही असा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरेंपुढे उभा राहील.’
शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही -संजय राऊत
राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौर्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. 2024 च्या आधी परिवर्तन होणार. तर डॅमेज कंट्रोलसाठी आधी डॅमेज व्हावे लागते. काही लोक सोडून गेली तर आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. पुढे ते म्हणाले की, शिवसेना एकच आहे. एकच राहील. गट तट हे तात्पुरते आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा वटवृक्षाचे बीज रोवले. त्या शिवसेनेचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहे. त्यांना संपुर्ण महाराष्ट्राचा अशिवार्द आहे. शिवसेना महावृक्ष आहे. महावृक्षाचा पालापाचोळा पडतो. ते लोक उचलून नेतो. पालापाचोळा जाळून त्यांचा वापर शेकोटीसाठी केला जातो.