बीड (रिपोर्टर) बीड शहरातील गल्ली बोळात मोठमोठ्या नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटत असून घाणीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे रोगराईचा धोका बीडकरांना निर्माण होत आहे. शहरातील मित्रनगर भागात गेल्या पाच दिवसांपूर्वी वरवरच्या नाल्या साफ करण्यात आल्या. ती घाण रस्त्यावर टाकली मात्र ती आता ती उचलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड नगरपालिकेचा सीओ म्हणून नीता अंधारे यांनी पदभार घेतल्यानंतर शहरातील बर्यापैकी स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागत आहे. मात्र काही भागात अनेक दिवसांपासून तुंबलेल्या नाल्या साफ केल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी सफाई कामगार फक्त नालीतील वरवरचा कचरा काढतात आणि तो रस्त्याच्या कडेला टाकतात. आठ दिवस हा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे त्यातील 75 टक्के कचरा पुन्हा नालीत जातो. मोकाट कुत्रे, जनावरे हा कचरा रस्त्यावर पसरवतात. त्यामुळे मोठी दुर्गंधी सुटते. या दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. शहरातील मित्रनगर भागात गेल्या पाच-सहा दिवसांपुर्वी वरवरच्या नाल्या साफ करण्यात आल्या. मात्र कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकला तो अद्यापपर्यंत उचलला नाही. त्यामुळे हा कचरा कोण उचलणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुद्याकडे नवनियुक्त आणि कर्तव्यदक्ष असलेल्या सीओ नीता अंधारे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.