बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी तब्बल दीड वर्ष जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांची बदली औरंगाबाद येथे सिडकोचे प्रशासक म्हणून झाली आहे. दीपा मुधोळ-मुंडे यांचे सासर बीड जिल्ह्यात असल्याने जिल्ह्याचा अभ्यास बर्यापैकी दीपा मुधोळ यांना आहे. जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्याचा मान त्यांना मिळाला असून ऊसतोड कामगारांचे प्रश्न, रेल्वेचे सुरू असलेले काम गतीने पुर्ण करणे आणि जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखणे हे
आव्हाने नूतन जिल्हाधिकार्यांसमोर आहे.
दोन वर्षापूर्वी महिला जिल्हाधिकारी म्हणून प्रेरणा देशभ्रतार यांची राज्य सरकारने नियुक्ती केली होती, मात्र त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे एक महिला जिल्हाधिकारी म्हणून सहाजिकच इतिहासात पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांची नोंद होईल. दीपा मुधोळ या कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. उस्मानाबाद येथे त्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधनाची बचत व्हावी म्हणून आठवड्यातला एक दिवस ‘नो व्हेईकल डे अॅण्ड वन डे सायकल डे’ ही मोहीम त्यांनी राबविली होती. उस्मानाबाद या ठिकाणी महसूलच्या सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी एक दिवस सायकलवरूनच कार्यालयात येणे बंधनकारक केले होते. एक संवेदनशील अधिकारी म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. उसतोड कामगारांच्या मुलांचे वस्तीगृह, ऊसतोड कामगारांचा विमा, रेल्वेचे सुरू असलेल्या कामाचे गतीने काम करून घेणे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शेतकर्यांच्या आत्महत्या रोखणे, मागासवर्गीयांच्या येाजनांना गतीने देणे आदी आव्हाने नूतन जिल्हाधिकार्यांसमोर आहे. मावळते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी बिंदुसरा नदीचे स्वच्छताकरण करणे, नदीच्या दोन्ही बाजुने मॉर्निंग वॉक फुटपाथ तयार करणे, झाडे लावणे या मोहिमेलाही त्यांना गती द्यावी लागणार आहे. आज पदभार स्वीकारल्यानंतर अनेक महसूल संघटनांनी त्यांचे स्वागत केले आहे. जिल्ह्यातील सामान्य माणसाच्याही दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.
राधाबिनोद शर्मा यांची कारकिर्द
लक्षात राहण्यासारखी
दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मावळते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे प्रश्नांची जाण असणारे अधिकारी म्हणून सामान्य माणसात परिचीत झाले होते. जिल्हावासियांची आणि त्यांची नाळ चांगली जुळली होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी बिंदुसरे नदीतील घाण काढणे, तिचे सौंदर्यकरण करणे आणि राज्य सरकारकडून मोठा निधी उपलब्द करून देण्यात त्यांचा पुर्ण सहभाग आहे. रेल्वे भूसंपादनाचे कामही त्यांनी पुर्ण केल्यामुळे रेल्वेच्या कामाला चांगली गती येणार आहे. बीड जिल्ह्यातील लोक खुपच प्रेमळ आणि मायाळू आहेत, इथे येण्यापुर्वी ज्यांचा बीडचा काही संंबंध नाही अशा लोकांकडून उगच बीडचे चित्र चांगले रेखाटले जात नाही. मात्र प्रत्यक्ष बीडमध्ये दीड वर्ष काम करताना बीड जिल्ह्यातील लोक हे ‘बेस्ट’ आहेत, एवढेच मी सांगेन असेही त्यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.