पाहणी करण्यासाठी पथक आज परळी तालुक्यात
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये नरेगाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. काही कामांमध्ये अनियमितता असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. मध्यंतरी तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बांधावर जावून बीड तालुक्यातील काही कामांची पाहणी केली होती. आता नरेगाची कामे पाहण्यासाठी केंद्राचे पथक बीडमध्ये दाखल झालेअसून हे पथक परळी तालुक्यातील कामांची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. कामाची पाहणी करण्यासाठी पथक आल्याने बोगस कामे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. बीड, परळी, धारूर आणि केज या तालुक्यातील कामांची पाहणी करण्यात येणार आहे. पथकासोबत स्थानिकच्या अधिकार्यांसह कर्मचारी सहभागी आहेत.
केंद्र शासनाचे रोजगार हमी योजनेवर नियंत्रक म्हणून सुमित गोस्वामी हे काम पाहतात. त्यांनी आज नरेगा व इतर दहा विभागांमार्फत बीड जिल्ह्यात होत असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी परळी तालुक्यातील काही कामांची निवड केली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्ता, शेततळे, फळबाग तसेच बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय लायली हुड अंतर्गत सिरसाळा या ठिकाणी होत असलेल्या गावातील विकासात्मक कामांची पाहणी करणे, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत सुरू असलेले कामे आणि केंद्र सरकारने गावांना सडकद्वारे जोडणे म्हणजेच पंतप्रधान ग्राम सडक योजना या कामांची पाहणी करून त्याचा अहवाल ते केंद्र सरकारला सादर करणार आहेत. बीड जिल्ह्यात परळीसह इतर ठिकाणी या योजनेअंतर्गत सुरू असेलेल्या कामांची ते पाहणी करणार आहेत. त्यांच्या समवेत जिल्हा परिषद, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे, नरेगा विभागाचे गटविकास अधिकारी, सचिव सानप आदी अधिकारी त्यांच्या समवेत आहेत. दरम्यान हे पथक बीड, परळी, धारूर, केज या तालुक्यातील कामांची पाहणी करणार आहे. कामाची पाहणी करण्यासाठी पथक आल्याने बोगस काम करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
बीड तालुक्यातील सात ग्रा.पं. अंतर्गत होणार कामांची पाहणी
बीड तालुक्यातील आहेरचिंचोली, सफेपूर, गवारी, हिवरापहाडी, कांबी, कुमशी, समनापूर, उमरद जहागीर या सात ग्रा.पं. अंतर्गत जे कामे झालेले आहेत त्या कामांची पाहणी सदरील पथक करणार आहे.