पुणे(रिपोर्टर): छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात मानापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं. शिवभक्तांना शिवनेरी गडावर दर्शन घेण्यास रोखण्यात आल्याची तक्रार करत माजी खासदार संभाजी छत्रपती संतापलेले पाहायला मिळाले. शिवभक्तांची नाराजी त्यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी बोलून दाखवली आणि कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर जाण्यासही नकार दिला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजी छत्रपतींची समजून काढण्याचा प्रयत्न केला. पण शिवनेरीवर दुजाभाव कशासाठी? असा सवाल उपस्थित करत संभाजी छत्रपतींनी व्यासपीठावर न जाणं पसंत केलं.
शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी काही व्हिआयपींना पासेस देऊन सोडण्यात येत आहे आणि शिवभक्तांना मात्र रोखून धरण्यात आलं आहे, अशी तक्रार शिवभक्तांनी छत्रपती संभाजी यांच्याकडे केली. हा प्रकार पाहून संभाजी छत्रपती प्रचंड संतापले आणि थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारला. शिवनेरीवर दुजाभाव होता कामा नये. जोपर्यंत शिवनेरीवर शिवप्रेमींना सोडलं जात नाही. तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा संभाजीराजे यांनी घेतला. यामुळे शिवनेरीवर काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
पुरातत्व विभागाने सांगितलं की महाराजांचा जन्म झाला तिथं जाता येणार नाही. तसं असेल तर मग इतर कुणालाही तिथं जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? हा असा कुठला नियम आहे? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन
शिवनेरीवर आयोजित शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या नाराजीची दखल घेत आपल्या भाषणातून त्यांना व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं. तसंच पुढच्यावेळेपासून व्यवस्थित नियोजन केलं जाईल अशी ग्वाही संभाजीराजेंना दिली. मी तुमच्या भावनांची नोंद घेतली आहे. तुमच्या भावना ऐकल्या आहेत. हे सरकार तुमचंच आहे. आपण शिवरायांचे मावळे आहोत. किल्ले जपण्याचं आपण एकत्रित येऊन काम करू. पुढच्यावर्षीचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल असं आश्वासन मी देतो, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीराजे छत्रपतींची समजूत काढण्याचा प्रयत्न यावेळी केला.