बीड (रिपोर्टर) गेल्या वर्षी कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला त्यामुळे बीड जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या लागवडीमध्ये वाढ झाली. त्यात सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. सुरुवातीला कापसाचे भाव 9 ते साडेनऊ हजार राहिले. मात्र किमान दहा हजार भाव कापसाला मिळाल्याशिवाय जीनिंगमध्ये कापूस घालायचा नाही. साडेनऊ हजार रुपये कापसाचा भाव झाला आहे, आणखी 500 रुपये नक्की वाढेल आणि दहा हजार रुपये भाव मिळेल या आशेवर ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांनी आपला कापूस जिनिंगवर टाकला. मात्र अमानत टाकल्यापासून कापसाच्या भावात उतार होत असून आज प्रतिक्विंटल दोन हजार रुपये भाव कमी झाला आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांच्या डोल्यात पाणी आले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये ऊस आणि कापूस या दोन नगदी पिकांकडे शेतकर्यांचा ओढा आहे. ज्या शेतकर्यांना उन्हात उसाला पाणी देता येते असे शेतकरी ऊस लावतात तर कोरडवाहू शेतकरी कापसाची लागवड करतात. कापसाच्या बियाणांच्या खर्चापासून फवारणी आणि कापूस वेचणीचा खर्च असे मिळून या शेतकर्यांना क्विंटलमागे किमान 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे सात हजार रुपये कापसाला भाव परवडत नाही. दहा हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाला भाव आला तर शेतकर्यांचे आर्थिक गणित थोड्या प्रमाणात बरोबर येते. मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कापसाच्या भावात वाढ होण्याऐवजी सतत उतारच होत आहे. एका क्विंटलमागे दोन हजार रुपये भाव कमी होणे म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. 14 जानेवारीनंतर कापसाचे भाव वाढतील, याची आशा शेतकर्यांना होती मात्र मार्च महिना उजळला तरी कापसाचे भाव वाढण्याऐवजी उतरत आहेत. शेतकर्यांनी मुंबईत सेबीच्या कार्यालयासमोर आंदोलने केले, सेबी कापूस व्यापारामध्ये हस्तक्षेप करून कापूस गाठीने निर्यातीला प्रोत्साहन मिळेल आणि मग तरी भाव वाढतील, अशी आशा शेतकर्यांना होती मात्र आजच्या तारखेत प्रत्येक दिवसाला शंभर रुपयाने भाव कमी होत आहे. पाच महिन्यांपूर्वी जिनिंगला अनामत म्हणून टाकलेल्या कापसामुळे जिनिंग चालकाला पैसे न गुंतवता पाच महिने मोफत कापसाचा कच्चा माल वापरायला मिळाला. त्यातून जिनिंग चालक मात्र सरकी उत्पादन, कापसाच्या गाठीचे उत्पादन करून सक्षम झाला तर दुसरीकडे शेतकरी मात्र देशोधडीला लागलाय.