बीड (रिपोर्टर) तुझी बहीण आत्महत्या करण्यासाठी निघाली आहे, माझाही तुला शेवटचा कॉल आहे, असा फोन मेहुण्याला करून बेपत्ता झालेल्या बहीण आणि दाजीची तक्रार घेऊन एकजण माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पती-पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पत्नी शेतात मिळून आली तर पती अद्यापही बेपत्ता आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले.
भीमराव संपतराव टेहळे (रा. घोणसी बु. ता. घणसावंगी जि. जालना) यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसात आज सकाळी दाखल होत कविता गजानन देवकते व गजानन बालासाहेब देवकते (रा. खरात आडगाव ता. माजलगाव) ही माझी बहीण आणि दाजी असून ते काल रात्री बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मला दाजीने काल रात्री कॉल करून तुझी बहीण आत्महत्या करण्यासाठी निघून गेली, मीही तुला शेवटचा कॉल करत आहे, असे म्हणून फोन कट केला. दोघांचाही आम्ही रात्रभर शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही, अशी तक्रार माजलगाव पोलिसात दिल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून एपीआय विजयसिंह जोनवाल, पो.हवालदार गोरे, पो.ना. देवकते यांनी तत्काळ खरातआडगाव येथे जात तेथील शिवार ना शिवार पायाखाली घालून पती-पत्नीचा शोध घेतला असता कविता गजानन देवकते या नैराश्येग्रस्त अवस्थेत मिळून आल्या. त्यांची पोलिसांनी समजूत काढत नातेवाईकांच्या स्वाधीन केले तर गजानन बालासाहेब देवकते अद्यापही बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले.