परळी (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यातून सर्रासपणे गुटखा येत आहे. रात्री सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत हे गस्त घालत असताना त्यांना परळी-गंगाखेड रोडवर काहीतरी संशयास्पद हालचाली दिसून आल्या. कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याठिकाणी एका टेम्पोतून गुटखा उतरवला जात होता. पोलिसांनी गुटख्यासह टेम्पो जप्त केला. टेम्पोमध्ये 33 लाख 21 हजार 600 रुपयांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा इंदोर येथून आला होता. या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत हे परळी रोडवर रात्री गस्त घालत होते. परळी ते गंगाखेड रोडवर एन.के. देशमुख पेट्रोल पंपाच्या बाजुला कुमावत यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांनी त्याठिकाणी आपली गाडी उभा केली असता काही टेम्पो (क्र. एच.आर. 69 डी. 2302) मधून मजूर गुटखा उतरवत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून गुटख्याचे 69 मोठे भोत, सुगंधी तंबाखूचे 14 भोत असा एकूण 32 लाख 21 हजार 600 रुपयांचा माल आढळून आला. टेम्पो 18 लाख रुपयांचा, एक मोबाईल 15 हजार रुपयांचा असा एकूण 51 लाख 36 हजार 600 रुपयांचा माल मिळून आला. या प्रकरणाची चौकशी केली असता हा गुटखा इंदोर येथून मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आठ आरोपींविरुद्ध मुकुंद शामराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत, फौजदार मुकुंद ढाकणे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गिते, विकास चोपणे यांनी केली.