मराठवाड्यातील बीड, धाराशिव जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान
बीड (रिपोर्टर)ः-तिसर्या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे.. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. नाशिक जिल्ह्यात आठ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 7 हजार 305 हेक्टरवर नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असले तरी कृषी विभागाने 2762 एकरवर नूकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच मका, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाच्या पहिल्या टप्प्यात 4 ते 9 मार्च दरम्यान झालेल्या गारपीटीने 15 जिल्ह्यांमध्ये 38 हजार 606 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं होतं. त्यानंतर 15 ते 21 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1 लाख सात हजार हेक्टरी पिकांच नुकसान झाले आहे. तर आता तिसर्या अवकाळी पावसामध्ये 28 हजार 287 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं अंदाज कृषी विभागाला आहे. मराठवाड्यातील केवळ बीड आणि धाराशिव जिल्ह्यात तिसर्या अवकाळी पावसाने हैदास घातल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. धारशिव मध्ये 2856 हेक्टर शेती अवकाळी पावसामुळे बाधीत झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. तर बीड जिल्ह्यात 2762 एकर शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. मात्र बीड जिल्ह्यात तिसर्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. अनेक ठिकाणच्या फळबागा उध्दवस्त झाल्या. मका, गहू, कांदा, हरभरा याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर बहूतांशी ठिकाणी शेतकर्यांनी ज्वारी शेतात काढून ठेवली आहे. त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.