सावरगावात 8 ट्रॅक्टरसह 10 केन्या जप्त; म्हाळस पिंपळगावात दोन हायवा, एक ट्रक, तीन केन्यांसह ट्रॅक्टर जप्त
गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातून वाहत जाणार्या गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे. याची ओरड झाल्यानंतर आज महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाने गोदावरी पात्र धुंडाळून काढले तेव्हा सावरगाव परिसरात वाळू उपसा करणार्या दहा केन्यांसह आठ ट्रॅक्टर सहायक पोलीस अधिक्षक धिरजकुमार बच्चू यांनी जप्त केल्या. तर म्हाळस पिंपळगाव हद्दीत तहसीलदार सचीन खाडे यांच्या पथकाने तीन केन्यासह ट्रॅक्टर, दोन हायवा, एक ट्रक ताब्यात घेतले. या कारवाईने वाळू माफियात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत खामगाव, सावरगाव शिवारामध्ये गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक बच्चू यांना झाल्यानंतर पथकातील सहायक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, आतिष कुमार, अशोक नामदास, गणेश नवले, थापाडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोंडे यांनी गोदावरी पात्रात उतरून दहा केन्यासह आठ ट्रॅक्टर ताब्यात घेऊन केवळ एक हजार ते अकराशे ब्रास वाळू जप्त केली. कारवाई दरम्यान उपस्थित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. तर दुसरी कारवाई ही म्हाळसपिंपळगाव हद्दीत तहसीलदार सचीन खाडे, यांच्या पथकाने केली. रात्री म्हाळसपिंपळगाव परिसरातील नदी पात्रात वाळू उपसा केला जात असल्याची माहीती पथकाला झाल्यानंतर पथकाने घटनास्थळावर धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली असता केनी द्वारे वाळू उपसा केला जात होता तो ट्रक आण ट्रॅक्टरमध्ये टाकला जात होता. त्याक्षणी छापा मारला असता तीन केन्या, ट्रॅक्टर, दोन हायवा, एक ट्रक ताब्यात घेऊन वाळू जप्त केली. ही कारवाई नायब तहसीलदार जाधवर, मंडल अधिकारी जितेंद्र लेंडाळ, देशमुख, ठाकूर, दिगांबर गिरी, गजानन शिंगणे, श्रीकृष्ण चव्हाण, अशोक बेलमुर, पो.कॉ. हिंगेरवार यांनी केली.